Join us  

महाअधिवेशनाच्या बैठकीत 'या' दोन मनसे नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 9:53 PM

अधिवेशनाआधी आज मनसेने राजगड कार्यलायात पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.

मुंबई: मनसेचं आगामी 23 जानेवारीला महाअधिवेशन मुंबईत होणार असून या अधिवेशनाआधी आज मनसेने राजगड कार्यलायात पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर आणि मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्यात शाब्दिक वाद झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

मनसेने आज मुंबईतील राजगड कार्यालयात महाअधिवेशनाच्या पार्श्वभुमिवर पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये बाळा नांदगावकर यांनी एका दिलेल्या मुलाखतीत पक्षाचे नेते, महिला, विद्यार्थी आणि कामगार संघटना पक्षाच्या वाढीसाठी कमी पडलो असल्याचं वक्तव्य केलं होतं. बाळा नांदगावकरांच्या या वक्तव्यावरुन पक्षातील अनेक नेते व पदाधिकारी नाराज असल्याचे सांगण्यात आले. तसेच बाळा नांदगावकरांच्या विधानावरुनच आदित्य शिरोडकर आणि बाळा नांदगावकर यांच्यात शाब्दिक वाद झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईतल्या सर्व पदाधिकारी आणि नेत्यांसमोर हा प्रकार घडल्याने पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

दरम्यान, आगामी 23 जानेवारीला मनसेचं महाअधिवेशन असून या अधिवेशनात राज ठाकरे नवी भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच नागरिकत्व कायद्यावरुन राज्यात जे आंदोलन सुरु आहे, नवीन सरकारची कामगिरी या सर्व विषयावर राज ठाकरे बोलणार असल्याची शक्यत वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी आतापर्यत नरेंद्र मोदींच्या धोरणावर खूप आगपाखड केली आहे. त्यामुळे मनसेने भाजपासोबत युती करण्याचे संकेत दिले असले तरी भाजपा मनसेला सोबत घेणार का हे आगामी काळातचं समोर येणार आहे.

टॅग्स :राज ठाकरेबाळा नांदगावकरमनसेमहाराष्ट्रमुंबई