होळीला पहिल्यासारखी सर नाही; आता नुसताच धिंगाणा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 12:19 IST2025-03-13T12:19:40+5:302025-03-13T12:19:40+5:30
आता २१ व्या शतकात होळीला ती सर राहिली नाही

होळीला पहिल्यासारखी सर नाही; आता नुसताच धिंगाणा !
मुंबई : होळी आणि धूलिवंदनाच्या सणामध्ये पूर्वीसारखी मजा राहिलेली नाही. कृत्रिम रंगांचा वापर आणि डीजेचा दणदणाट यामुळे नुसताच धिंगाणा पाहायला मिळत असल्याची बोलकी प्रतिक्रिया मुंबईकरांकडून आता व्यक्त केली जात आहे.
साधारणत: ९० च्या दशकात कोकणातील नोकरदार, माणदेशी माणसे, उत्तर भारतीय, राजस्थानी असे एकत्र होळी साजरी करत असत. आता २१ व्या शतकात होळीला ती सर राहिली नाही. वाडी-वस्ती, चाळीतील मंडळी १५ दिवस अगोदरपासून लाकडे गोळा करत असत. होळी उभी केल्यानंतर शेणाच्या गोवऱ्या, हारतुरे, साखरेची माळ सभोवताली लावत. अगदी शेंड्यावर एरंडीच्या झाडाच्या फांदी लावून होळी सजवत. तत्पूर्वी होळी उभी करण्याआधी चव्हाट्यावर नारळ दिला जात असे. तेथे गाऱ्हाणे घालण्यात येई. सूर्यास्ताला होळीच्या सभोवताली दिवे लावत. पूजा, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून नारळ अर्पण करत. मात्र, अलीकडचे व्यस्त रुटीन, होळीच्या होमासाठी जागेचा अभाव, आदी कारणांमुळे ती मजा राहिलेली नाही, अशी खंत ज्येष्ठांनी व्यक्त केली.
पावित्र्य लोप पावले, घातक रंग त्रासदायक
आता होळीचे पावित्र्य लोप पावले वाटते. एकमेकांना घातक रंग लावतात ही बाब आरोग्यासाठी त्रासदायक आहे. धूलिवंदनाच्या दिवशीही होळीच्या विस्तवात सकाळी पाण्याचा टोप ठेवत, पाणी गरम करून त्या पाण्याने अंघोळ करण्याची परंपरा आज मागे पडली आहे. होळीला अर्पण केलेले नारळाचे खोबरे प्रसाद म्हणून आवडीने खाणेही मागे पडले आहे, असे चिंचपोकळी येथील भाऊ सावंत यांनी सांगितले.
सोनेरी, चंदेरी रंग तोंडाला फासून लोकल, बस इतर वाहनांवर पाण्याच्या रंगांच्या पिशव्या मारण्यात तरुणाई धन्यता मानत आहे. पैसे वसूल होईपर्यंत तरुणाई डीजेवर थिरकत आहे. खरे तर होळी, धूलिवंदनाचा सण प्रेम, बंधुत्व, एकता दाखविण्याचे प्रतीक. मात्र, आजघडीला पारंपरिकतेऐवजी प्रत्येक गोष्टीचे मार्केटिंग होत असल्याने सणाला कमी आणि बाजारीकरणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे - विनोद घोलप, मालाड
आजही गिरगाव, लालबाग, माझगाव, ताडवाडी, डोंगरी, बीडीडी चाळी, दादर व माहीममधील जुन्या चाळी, कुर्ल्यातील ब्राह्मणवाडी, घाटकोपरची भटवाडी, भांडुपची खडी मशीन व बोरिवली, कांदिवलीतील मराठमोळ्या वस्त्यांत होळीसह धूलिवंदनाचा थाट जपण्याचा प्रयत्न केला जात आहे- प्रकाश बोरगावकर, वडाळा
होळीची परंपरा जपण्याचा प्रयत्न आजही काही गृहनिर्माण सोसायट्या करत आहेत. होलिकादहनापेक्षा दुसऱ्या दिवशीच्या धूलिवंदनाचे बाजारीकरण झाले आहे. मोठे-मोठे इव्हेंट आयोजित करून पाण्याचे फवारे एकमेकांवर उडवून रंग उधळले जात आहेत. डीजेवर खर्च करत धिंगाणा घातला जात आहे -अंकुश कुराडे, कांजूरमार्ग