दादरमध्ये १५ एप्रिलनंतर महावाहतूककोंडीची भीती; वरळी-शिवडी उन्नत मार्गिकेसाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल पाडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 10:03 IST2025-04-11T10:02:25+5:302025-04-11T10:03:10+5:30

केईएम, वाडिया रुग्णालय गाठताना होणार दमछाक.

Fear of massive traffic jam in Dadar after April 15 | दादरमध्ये १५ एप्रिलनंतर महावाहतूककोंडीची भीती; वरळी-शिवडी उन्नत मार्गिकेसाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल पाडणार

दादरमध्ये १५ एप्रिलनंतर महावाहतूककोंडीची भीती; वरळी-शिवडी उन्नत मार्गिकेसाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल पाडणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :  प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूल बंद केल्यावर सायन, माटुंग्याकडून येणारी आणि वरळी, लोअर परेल, महालक्ष्मीकडे जाणारी वाहतूक दादरच्या टिळक पुलावरून वळविली जाणार आहे. त्यामुळे दादर पश्चिमेला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची चिन्हे आहेत.

अटल सेतूची थेट वांद्रे-वरळी सी-लिंकला जोडणी देण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वरळी-शिवडी उन्नत मार्गिकेसाठी हा पूल पाडण्यात येणार आहे. त्यामुळे पाडकामासाठी १५ एप्रिलनंतर हा पूल बंद करण्याची परवानगी वाहतूक पोलिसांकडून मिळण्याची शक्यता आहे. 

पोलिस, पालिकेची जबाबदारी काय?
प्रभादेवी रेल्वे पूल वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर दादर भागात मोठी वाहतूककोंडी होईल. प्लाझा ते कबुतरखाना अंतर पार करताना वाहनचालकांच्या नाकीनऊ येतील. त्यामुळे या भागातील संभाव्य कोंडी टाळण्यासाठी रस्त्यावरील पथारी व्यावसायिकांना, फेरीवाल्यांना हटवावे लागेल. नागरिकांना चालण्यासाठी पदपथ मोकळे झाले तर रस्त्यावरील वाहतुकीचा वेग वाढेल. त्यासाठी पुढील दीड वर्ष वाहतूक पोलिस, पालिका आणि स्थानिक पोलिसांचे पथक प्रत्येक चौकात तैनात ठेवावे, अशी मागणी दादर व्यापारी संघाचे सुनील शहा यांनी केली.

वाहतूक तज्ज्ञांचा सल्ला
पूल बंद करण्यामुळे होणाऱ्या परिणामांचा, प्रश्नांचा आणि त्यावरील उपाययोजनांचा वाहतूक पोलिसांनी आधी अभ्यास करावा. त्यानंतर वाहतूक नियंत्रणासाठी स्थानिक पातळीवर समिती नेमून तिच्या सूचनांप्रमाणे उपाययोजना कराव्यात. त्यानंतरच पूल वाहतुकीसाठी बंद करावा, असा सल्ला वाहतूकतज्ज्ञ ए. व्ही. शेनॉय यांनी दिला आहे.  

प्रवासाची ३० मिनिटे वाढणार
लोअर परळ, ना.म. जोशी येथील रहिवाशांनी सांगितले की, प्रभादेवीचा पूल बंद झाल्यानंतर वाहतुकीसाठी दोन पुलांचा पर्याय आहे. 
यात दादर येथील टिळक ब्रीज आणि करीरोड येथील पुलाचा समावेश आहे. मात्र प्रभादेवी पुलाच्या वाहतुकीचा भार या दोन्ही पुलांवर पडेल. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढून ३० मिनिटांचा प्रवास वाढेल. करीरोडच्या तुलनेत दादरला त्याचा अधिक फटका बसेल. लोअर परळ एसटी डेपोमधून सर्व बस एल्फिन्स्टन पूलावरून दादरला येतात. आता एसटीला वळसा घालून दादरला जावे लागेल.

बदलणारे वाहतूक मार्ग 

पश्चिम वाहिनी : दादर पश्चिमेकडे जाणारी वाहने मडके बुवा चौक येथून उजवे वळण घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने खोदादाद सर्कल (दादर टीटी) येथे येतील आणि तेथून डावे वळण घेऊन टिळक पुलावरून मार्गस्थ होतील.

सायन, माटुंग्याकडून येऊन प्रभादेवी पुलावरून प्रभादेवी आणि वरळीकडे जाणारी वाहने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर खोदादाद सर्कल (दादर टीटी) येथे उजवे वळण घेऊन टिळक पुलावरून जातील.

वळविलेले वाहतूक मार्ग

पूर्व वाहिनी : सेनापती बापट मार्गाने प्रभादेवी पुलामार्गे सायन, माटुंग्याकडे जाणारी वाहने सेनापती बापट मार्गावरून डावे वळण घेऊन व्ही. एस. मटकर मार्ग आणि बाबूराव परुळेकर मार्ग येथून उजवे वळण घेऊन भवानी शंकर रोडने पुढे कबुतरखाना, हनुमान मंदिर सर्कल येथून उजवे वळण घेऊन पुढे एन.सी. केळकर रोडने कोतवाल गार्डनकडे येतील. तेथून उजवे वळण घेऊन टिळक पुलामार्गे खोदादाद सर्कल (दादर टीटी जंक्शन) येथून जातील.

आधी नवा पूल उभारा, मग जुना तोडा!

प्रभादेवी रेल्वे स्टेशनवर पश्चिमेकडून पूर्वेला सेंट्रल रेल्वे वर्कशॉपपर्यंत नवीन पादचारी पूल तयार होत नाही तोपर्यंत या पुलाचे तोडकाम सुरू करू नये, अशी मागणी उद्धवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. प्रभादेवीचा पूल बंद झाल्यानंतर नागरिकांना दादर स्टेशनच्या टिळक पुलाचा किंवा पुढे करी रोड पुलाचा वापर करावा लागणार आहे. स्टेशनच्या पूर्वेकडील केईएम, वाडिया, टाटा या हॉस्पिटलला जाणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांचे प्रचंड हाल होतील. 
तसेच या परिसरातील नोकरदारांबरोबरच महाविद्यालय, शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचीही मोठी गैरसोय होणार आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

Web Title: Fear of massive traffic jam in Dadar after April 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.