Join us  

बीएसएनएल कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढण्याची भीती; स्वेच्छानिवृत्तीसाठी ६२ टक्के कर्मचाऱ्यांंचे अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 5:11 AM

स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केलेल्या कर्मचाऱ्यांचा ३१ जानेवारी २०२० हा कामाचा शेवटचा दिवस असेल.

- खलील गिरकर मुंबई : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या महाराष्ट्रातील सुमारे ६२ टक्के कर्मचारी व अधिकाऱ्यांनी म्हणजे एकूण १३ हजार ६७२ कर्मचाऱ्यांपैकी ८,५४४ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे आता शिल्लक राहिलेल्या ५,१२८ कर्मचाऱ्यांवर कामाचा सर्व भार पडणार असून, त्यामुळे सेवेचा दर्जा खालावण्याची भीती या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केलेल्या कर्मचाऱ्यांचा ३१ जानेवारी २०२० हा कामाचा शेवटचा दिवस असेल. त्यानंतर अवघे ५,१२८ कर्मचारी, अधिकारी बीएसएनएलमध्ये कार्यरत असतील. त्यांच्यावर कामाचा ताण येऊ नये यासाठी बीएसएनएलच्या विविध कामांचे आउटसोर्सिंग करण्याचा व ते काम कंत्राटी कामगार नेमून करण्याचा विचार सुरू आहे. मात्र या कंत्राटी कामगारांना कामाचा किती अनुभव असेल, त्यामुळे कामाचा दर्जा नेमका कसा राहील, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

स्वेच्छानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार पुन्हा संधी

कंत्राटी कामगारांना कामाचा किती अनुभव असेल, असा प्रश्न असून यामुळे कामाचा दर्जा खालावण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. हीच भीती लक्षात घेऊन आता स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केलेल्या कर्मचारी, अधिकाºयांपैकी काहींची कंत्राटी काम देण्याची शक्यताही बीएसएनएलमधून व्यक्त केली जात आहे.

एकूण ९२ हजार ९५६ अर्ज दाखल

बीएसएनएलचे सध्या देशात १ लाख ५३ हजार ७८६ कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत. त्यापैकी ७८ हजार ५६९ कर्मचारी व अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले आहेत तर ७५ हजार २१७ कर्मचारी सेवेत राहणार आहेत. महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल)मधील एकूण १६ हजार ३७० कर्मचाऱ्यांपैकी १४ हजार ३८७ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. अशा प्रकारे बीएसएनएल व एमटीएनएलमधील एकूण ९२ हजार ९५६ जणांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले आहेत.

टॅग्स :बीएसएनएलमहाराष्ट्रमहाराष्ट्र सरकारकर्मचारी