मुंबईतील कांदिवलीतील काजूपाडा परिसरात राहणाऱ्या एका मुलाने दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवून आई-वडिलांच्या कष्टायचे चीज केले. किशन ठाकूर, असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. किशनने सरकारी शाळेत शिक्षण घेतले असून त्याच्या वडिलांचे सायकल दुरुस्तीचे दुकान आहे. किशनच्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असतानाही त्याने जिद्द सोडली नाही आणि दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले.
किशनने वडील लक्ष्मी ठाकूर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रस्त्याच्या कडेला सायकल दुरुस्त करतात. ठाकूर कुटुंब कांदिवलीतील काजूपाडा येथील झोपडपट्टीत एका लहान भाड्याच्या खोलीत राहतात. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही किशनने त्याच्या अभ्यासावर दुर्लक्ष होऊ दिले नाही. अभ्यास करून तो आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी सायकलच्या दुकानावर जायचा, अशी माहिती इंडिया टुडेने दिली.
आई- वडिलांचा आनंद गगनात मावेना"मी खूप आनंदी आहे. माझ्या मुलाकडून मला हेच अपेक्षित होते. त्याने आयुष्यात पुढे जावे असे मला वाटते", असे किशनचे वडील म्हणाले. "आमचा मुलगा खूप मेहनती आहे आणि आम्हाला त्याला चार्टर्ड अकाउंटंट बनायचे आहे", असे किशनची आई म्हणाली. तर, किशनने त्याच्या यशाचे श्रेय त्याची शाळा, कोचिंग सेंटर आणि कुटुंबाला दिले. शिक्षणामुळे जीवन बदलू शकते असा त्याचा विश्वास आहे. किशन आता अनेकांसाठी प्रेरणा ठरला आहे. कठोर परिश्रमामुळे कठीण परिस्थितीवरही मात केली जाऊ शकते, असे किशनने सिद्ध करून दाखवले.