मुंबई-अहमदाबाद महामार्गावर टँकर-बस यांचा भीषण अपघात; वाहनांचे नुकसान, एक ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 08:59 IST2025-06-02T08:59:03+5:302025-06-02T08:59:47+5:30
टँकर ट्रेलर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुर्घटना

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर टँकर-बस यांचा भीषण अपघात; वाहनांचे नुकसान, एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क, डहाणू: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गेले काही दिवस अपघाताचे सत्र सुरूच आहे. शनिवारी, रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी दापचरी हद्दीत टँकर आणि लक्झरी बसच्या धडकेत एकाचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी आहे.
गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या टँकर ट्रेलर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकरने रस्त्यावरील डिव्हायडर तोडून गुजरात वाहिनीवर गेल्याने समोरून येणाऱ्या लक्झरी बसला जोरदार धडक बसल्याने बस उलटली. यात बसमधील क्लीनर रियाज गुलाब पट्टी (३०, रा.करसनपुरा, जि.बनासकांठा, गुजरात) याचा मृत्यू झाला, तर सईद इत्येयास दाबा (२५, रा.पाटन, गुजरात) हा जखमी झाला. त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
अपघाताची माहिती महामार्ग पोलिस नियंत्रण कक्षास मिळताच, पोलिस उपनिरीक्षक विजय प्रहाड आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जात अपघातग्रस्त वाहने हटविली. फिर्यादी सिकंदर सुरेमान राजद (२६, रा.जसलानी, ता.पालनपूर, गुजरात) यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाल्यानंतर टँकर चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे.