शेतकऱ्यांना मिळणार २४ तास वीज; १६ नवीन सौर प्रकल्प, तीन तालुक्यांना लाभ, मुंबईत दिले कार्यारंभ आदेश

By रवींद्र चांदेकर | Published: March 7, 2024 07:13 PM2024-03-07T19:13:09+5:302024-03-07T19:13:35+5:30

Wardha News: राज्य सरकारने आर्वी विधानसभा मतदारसंघात २४ तास वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी योजनेंतर्गत आर्वी उपविभागातील १६ उपकेंद्रावर सौर ऊर्जेच्या माध्यमातून २१ हजार शेेतकऱ्यांना १२ तास वीज उपलब्ध होणार आहे.

Farmers will get 24 hours electricity; 16 new solar projects, three talukas benefited, commissioning orders given in Mumbai | शेतकऱ्यांना मिळणार २४ तास वीज; १६ नवीन सौर प्रकल्प, तीन तालुक्यांना लाभ, मुंबईत दिले कार्यारंभ आदेश

शेतकऱ्यांना मिळणार २४ तास वीज; १६ नवीन सौर प्रकल्प, तीन तालुक्यांना लाभ, मुंबईत दिले कार्यारंभ आदेश

- रवींद्र चांदेकर
वर्धा - आर्वी  विधानसभा मतदारसंघातील बहुतांश शेती जंगलाला लागून आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा त्रास शेतकऱ्यांना होतो. वन्यप्राण्यांनी अनेक शेतकरी, मजुरांना ठार केले, अनेकांना जायबंदी केले, शेकडो, जनावरांचा फडशा पाडला. त्यामुळे शेतकऱ्यांना ओलितासाठी रात्री १२ तास वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी भाजपचे लोकसभा प्रमुख सुमित वानखेडे यांच्याकडे केली होती. आता राज्य सरकारने आर्वी विधानसभा मतदारसंघात २४ तास वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी योजनेंतर्गत आर्वी उपविभागातील १६ उपकेंद्रावर सौर ऊर्जेच्या माध्यमातून २१ हजार शेेतकऱ्यांना १२ तास वीज उपलब्ध होणार असून त्याचे कार्यारंभ आदेश देण्यात आल्याचे सुमित वानखेडे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात सौर प्रकल्प उभारण्याबाबत विकासकांना कार्यादेश देण्यात आले. उपविभागात जंगलामुळे रात्री सिंचनासाठी शेतात जाताना वन्यप्राण्यांमुळे शेती करणे अवघड झाले होते. आता दिवसा वीज उपलब्ध होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री ओलीत करावे लागणार नाही. परिणामी, शेतकऱ्यांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार आहे. सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ मध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली होती. आता योजनेमध्ये आमूलाग्र परिवर्तन करून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. योजनेच्या घोषणेपासून ११ महिन्यांत नऊ हजार मेगा वॅट सौर ऊर्जानिर्मितीचे प्रकल्प खुल्या निविदा पद्धतीने अंतिम केले आहेत. त्यापैकी सात हजार ६६३ मेगा वॅटच्या प्रकल्पांसाठी विकासकांना गुरुवारी कार्यारंभ आदेश देण्यात आले. प्रत्येक प्रकल्प १८ महिन्यांत उभारले जाणार आहेत.

या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जा किफायतशीर दरात उपलब्ध होणार आहे. आता शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेलच, सोबत राज्य सरकारची दर वर्षी दोन हजार कोटी रुपये सबसिडी वाचेल. सौर ऊर्जा निर्मितीसाठी १८ हजार ८४ एकर जमीन उपलब्ध करण्यात आली. यामुळे ग्रामीण भागात २० हजार रोजगार निर्माण होतील. मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, महावितरणचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, संचालक वाणिज्य योगेश गडकरी यांच्या हस्ते नाकॉएफ ऊर्जा प्रा. लि. या कंपनीस कार्यारंभ आदेश देण्यात आले.

२७ पैकी २१ हजार शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यात २७ हजार शेतकरी आहेत. त्यापैकी २१ हजार शेतकऱ्यांना आता दिवसा वीज उपलब्ध होईल. शेतकऱ्यांची मोठी समस्या या योजनेमार्फत सुटणार आहे. राज्यात सर्वप्रथम आर्वी उपविभागातील शेतकऱ्यांना प्राधान्य दिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे लोकसभा निवडणूक प्रमुख सुमित वानखेडे यांनी आभार मानले.

Web Title: Farmers will get 24 hours electricity; 16 new solar projects, three talukas benefited, commissioning orders given in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.