Join us  

हापूसची बाजारातील भेसळ, विक्रीतील निर्बंध आणि घसरलेल्या भावामुळे कोकणातील शेतकरी अडचणीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 5:43 PM

Alphonso Mango : आंबा हा कोकणातील अर्थव्यवस्थेचा मुख्य भाग आहे. यंदा बाजारपेठेत निम्मे आंबे हे कर्नाटकातील असून कोकणातील हापूससोबत त्याची भेसळ केली जात आहे

मुंबई : आंब्याच्या मौसमात कोकणातील हापूसला ग्राहकांची मोठी मागणी असते. परंतु दरवर्षी कर्नाटकातील आंबा आणि कोकणातील हापूसची भेसळ करून हा माल बाजारात विकला जातो. याचा हापूसच्या दरावर परिणाम होतोच शिवाय ग्राहकांचीही फसवणूक होते. यंदाही बाजारात हेच चित्र दिसत आहे. यंदा कोकणात हापूसचे उत्पन्न २० ते ३० टक्के झाले असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे शेतकऱ्यांना आंबा विक्रीसाठी आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. या अडचणींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागू नये यासाठी 'ग्लोबल कोकण' आणि 'कोकण भूमी प्रतिष्ठान'ने पुढाकार घेत मुंबई, महाराष्ट्रात २० ठिकाणी 'शेतकरी आंबा बाजार'चे आयोजन केले आहे. माहीम, विलेपार्ले, बोरिवली, ठाणे, कामोठे, सीवूड, पनवेल परिसरात सकाळी ७ ते ११ दरम्यान 'शेतकरी आंबा बाजार' आयोजित करण्यात आला असून येत्या काही दिवसात नाशिक, नागपूरसह महाराष्ट्रातील विविध २० ठिकाणीही आयोजन केले जाणार आहे. या बाजारात शेतकरी, 'ग्लोबल कोकण'चे प्रतिनिधी रत्नागिरी, देवगड, विजयदुर्ग येथील शेतात लागवड झालेल्या हापूसची विक्री करत आहेत. यावेळी ऑर्डरही घेतली जात असून ग्राहकांना थेट सोसायटीत तसेच घरपोच डिलिव्हरीसुद्धा केली जाईल. 

वर्षभर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या श्रमाचा मोबदला मिळावा यासाठी प्रशासनाने, पोलिसांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशी विनंती 'ग्लोबल कोकण'चे संस्थापक संजय यादवराव यांनी कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना केली आहे. ''आंबा हा कोकणातील अर्थव्यवस्थेचा मुख्य भाग आहे. यंदा बाजारपेठेत निम्मे आंबे हे कर्नाटकातील असून कोकणातील हापूससोबत त्याची भेसळ केली जात आहे. यामुळे ग्राहकांची फसवणूक होत आहेच शिवाय यामुळे आंब्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांचेही आर्थिकदृष्ट्या नुकसान होत आहे. हे थांबणे गरजेचे आहे. शिवाय निर्बंधामुळे शेतकऱ्यांना आंबा विक्रीसाठी बाजारपेठही उपलब्ध नाही, वाहतुकीच्या समस्या निर्माण होत आहेत. हे सर्व पाहता आम्ही 'शेतकरी आंबा बाजार'चे आयोजन केले आहे. शेतकऱ्यांच्या जास्तीत जास्त आंबा पेटी या बाजारपेठेच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचाव्यात हे यामागचे उद्दिष्ट आहे.'' असे संजय यादवराव म्हणाले. ''या बाजारपेठेच्या माध्यमातून ग्राहकांना नैसर्गिकरित्या पिकवलेल्या हापूसचा आस्वाद घेता येईल शिवाय शेतकऱ्यांनाही त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळेल.'' असेही ते पुढे म्हणाले.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने 'ब्रेक द चेन' अंतर्गत लावलेल्या सर्व नियमांचे पालन करत कोकणातील शेतकरी सरसावले असून या बाजारच्या माध्यमातून स्वतःहून आंब्यांची विक्री करत आहेत. आंबा खरेदीसाठी ग्राहक शेतकरी समन्वयक यांच्या ९९२०३ ३०९२२, ८८५०८० ७२२७ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.  ग्राहकांना ऑनलाईन आंबे उपलब्ध करून देण्यासाठी 'ग्लोबल कोकण'च्या पुढाकाराने 'मायको' या मँगोटेक प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे. कोकणातील १०० शेतकऱ्यांनी एकत्र येत 'मायको' या देशातील पहिल्या मँगोटेक प्लॅटफॉर्मची निर्मिती केली.  www.mykofoods.com या संकेतस्थळावरून ग्राहक आंबे ऑनलाईन विकत घेऊ शकतात. प्रत्येक आंबा पेटीसोबत देण्यात येणाऱ्या विशेष क्यूआर कोडच्या स्कॅनिंगद्वारे ग्राहकांना त्यांनी विकत घेतलेला आंबा कोकणातील कोणत्या बागेत पिकवण्यात आला, शेतकऱ्याची माहिती, त्याची संपूर्ण आंबा बाग व्हिडीओच्या माध्यमातून पाहता येणार आहे.

टॅग्स :हापूस आंबाहापूस आंबाआंबामुंबईमहाराष्ट्रशेतकरीकोकण