शेतकरी संकटात, शेतमालाचे बाजारभाव ‘एमएसपी’पेक्षा कमी: आरबीआय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 07:42 IST2025-05-23T07:42:52+5:302025-05-23T07:42:52+5:30
गहू वगळता इतर सर्व प्रमुख शेतमालाचे बाजारभाव पडलेलेच; तेलाच्या किमती मात्र वाढलेल्याच; कांद्याच्या दरात झाली किरकोळ वाढ

शेतकरी संकटात, शेतमालाचे बाजारभाव ‘एमएसपी’पेक्षा कमी: आरबीआय
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात विक्रमी उत्पादन झाल्यामुळे गहू वगळता इतर सर्व प्रमुख शेतमालाचे बाजारभाव किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी असल्याचे आढळले, अशी माहिती आरबीआयने दिली आहे. त्यानुसार, अन्नधान्ये आणि डाळींच्या किमती मजबूत पडलेल्या आहेत.
बुलेटिननुसार, शेतमालाचे भाव पडलेले असताना सोयाबीन, सूर्यफूल, मोहरी आणि अन्य तेलाच्या किमती मात्र वाढत आहेत. पाम आणि शेंगदाणा तेलाच्या किमतीत थोडी नरमाई दिसत आहे. कांद्याच्या दरात सुधारणा झाली आहे. बटाटे आणि टोमॅटोच्या किमती वाढल्या आहेत.
हे अन्नसुरक्षेसाठी चांगले लक्षण, पण...
प्रमुख खरीप आणि रब्बी पिकांच्या मोठ्या प्रमाणात उत्पादनामुळे आणि महागाई रोखण्यासाठी उपाययोजनांमुळे, प्रमुख पिकांच्या (गहू वगळता) सरासरी बाजारभावात घट झाली आहे आणि ते त्यांच्या किमान आधारभूत किमतीपेक्षा (एमएसपी) कमी आहेत, हे देशाच्या अन्न सुरक्षेसाठी एक चांगले लक्षण मानले जात असले तरी शेतकऱ्यांपुढे मात्र आर्थिक संकट निर्माण करणारे आहे.
एमएसपी आणि बाजारभावातील फरक
पीक २०२४ २०२५
मका ०.८ ८.१
भात ६.० २.४
गहू १.९ १.२
तूर ५२.९ ७.१
मूग १.५ ६.७
मसूर ८.० ४.९
उडीद २९.६ २.१
चणा ६.६ ०.६
शेंगदाणे ३.५ २४.३
सोयाबीन २.६ १४.०
मोहरी ८.२ २.१