Join us  

'शेतकरी म्हणतोय 'किडनी घ्या पण, बियाणे द्या'; सरकारला काहीच पडलं नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 8:02 AM

अल्पभूधारक शेतकऱ्याला आर्थिक चणचण भासत असल्याने 'किडनी घ्या पण, बियाणे द्या' अशी करुण मागणी त्याने पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे

मुंबई - 'किडनी घ्या पण, बियाणे द्या' अशी करुण मागणी करणाऱ्या हिंगोलीच्या नामदेव पतंगे यांचा मुद्दा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नियम २८९अन्वये सभागृहात मांडला. मात्र धनंजय मुंडे यांची ही मागणी फेटाळण्यात आली त्यावर या सरकारला शेतकऱ्यांची काहीच पडलेली नाही असं म्हणत मुंडे यांनी सभागृहात संताप व्यक्त केला. 

गेल्या तीन वर्षांपासून हिंगोली जिल्ह्यात सततचा दुष्काळ आहे. या तीन वर्षात शेतकरी पुर्ण होरपळून निघाला आहे. दुष्काळाला कंटाळून शेणगाव तालुक्यातील नामदेव पतंगे या अल्पभूधारक शेतकऱ्याला आर्थिक चणचण भासत असल्याने 'किडनी घ्या पण, बियाणे द्या' अशी करुण मागणी त्याने पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि सभागृहात यावर चर्चा व्हायला हवी अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. मात्र मागणी फेटाळण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांच्या अवस्थेची सरकारला काहीच पडलेली नाही असे टीका त्यांनी केली. शेतकऱ्यांना पूर्वमशागतीसाठी पेरणीसाठी 25 हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी अशी मागणी मुंडे यांनी केली आहे. 

दरम्यान राज्यपालांच्या अभिभाषणात जुन्याच योजनांची आणि पूर्ण न झालेल्या घोषणांची लांबलचक यादी दिलेली आहे.  त्यात महाराष्ट्राच्या पुढील वाटचालीचे कोणतेही दिशादर्शन झालेलं नाही असा थेट आरोपही धनंजय मुंडे यांनी केला. राज्यातला शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. तो भीषण दुष्काळाशी सामना करतो आहे त्याला दिलासा दिला गेला नाही. राज्यातल्या बेरोजगारांचाही भ्रमनिरास केला आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले. हजारो शेतकरी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे आत्महत्या करीत आहेत. विशेष म्हणजे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून माझ्या मृत्युस आपण जबाबदार आहात असे लिहून शेतकरी आत्महत्या करीत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा सत्तेवर येण्यापूर्वी सरकारने केली होती. उत्पन्न दुप्पट झाले नाहीच उलट शेतमालाचे भाव पाडण्याचे कटकारस्थान या सरकारने केले.  दररोज सरासरी ७ शेतकरी आत्महत्या करीत असताना त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्याचा साधा मोठेपणा सरकार दाखवू शकलं नाही असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला.

टॅग्स :शेतकरीधनंजय मुंडेदेवेंद्र फडणवीस