‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 07:17 IST2026-01-02T07:14:33+5:302026-01-02T07:17:46+5:30
८ आमदार-खासदारांच्या घरातच उमेदवारी...; आमदार ते नगरसेवक ही राज्यातील दुर्मीळ घटना...!

‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात
मुंबई : शिंदेसेनेने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पक्षातील नेत्यांच्या घरात उमेदवारी दिली आहे. मुंबईतील आठ आमदार व खासदारांच्या कुटुंबात उमेदवारी दिली आहे, तर शिंदे यांना साथ देणाऱ्या माजी नगरसेवकांवरही पक्षाने विश्वास टाकला आहे. घराणेशाहीच्या मुद्द्यावरून उद्धवसेनेवर टीका करणाऱ्या शिंदे यांनी उमेदवारीत घराणेशाहीला प्राधान्य दिल्याचे मुंबईतील उमेदवारांवरून दिसून येते.
पक्षाचे माजी खासदार राहुल शेवाळे यांची भावजय वैशाली नयन शेवाळे यांना प्रभाग क्रमांक १८३ मधून, माजी आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान आणि मुलगी प्रिया यांना अनुक्रमे १९४ आणि १९१ मधून उमेदवारी तर कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडाळकर यांचे चिरंजीव जय कुडाळकर यांना प्रभाग क्रमांक १६९ मधून तिकीट मिळाले आहे.
‘फॅमिली फर्स्ट’ पॉलिसी...
चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे यांच्या पत्नी शैला, चेंबूरचे आमदार तुकाराम काते यांच्या घरात तन्वी काते आणि समृद्धी काते या दोघींना, भांडुपचे आमदार अशोक पाटील यांचा मुलगा प्रशांत पाटील यांना तिकीट मिळाले आहे. खासदार रवींद्र वायकर यांची कन्या दीप्ती वायकरला उमेदवारी देण्यात आली. तसेच माजी आमदार मंगेश सातमकर, दीपकबाबा हांडे यांच्या घरात उमेदवारी देण्यात आली आहे.
एका प्रभागात भाजप, शिंदेसेनेचा उमेदवार
मुंबई महापालिकेत शिंदेसेना युतीत निवडणूक लढवत आहे. मात्र, प्रभाग क्रमांक २२५ मध्ये दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
या प्रभागात ‘भाजप’ने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भावजय हर्षिता नार्वेकर यांना तर शिंदेसेनेने सुजाता सानप यांना उमेदवारी दिली आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत आहे.
त्यामुळे या प्रभागात युतीचा अधिकृत उमेदवार कोण?
हे स्पष्ट होईल. भाजप आणि शिंदेसेनेच्या उमेदवाराने माघार घेतली नाही तर येथे युतीत मैत्रिपूर्ण लढत होईल.
आमदार ते नगरसेवक ही राज्यातील दुर्मीळ घटना -
शिंदेसेनेने भायखळ्याच्या माजी आमदार यामिनी जाधव यांना मुंबई महापालिका निवडणुकीचे तिकीट दिले आहे. जाधव यांना प्रभाग क्रमांक २०९ मधून उमेदवारी मिळाली आहे. माजी आमदार पुन्हा नगरसेवकपदाच्या निवडणुकीत उतरल्याची राज्यातील ही दुर्मीळ घटना असेल. माजी आमदार दिवंगत श्रीकांत सरमळकर यांची सून पल्लवी सरमळकरला प्रभाग क्रमांक ९४ मधून तिकीट मिळाले आहे. याशिवाय माजी नगरसेवक संध्या विपुल दोषी, राजू पेडणेकर, राजूल पटेल, सुवर्णा करंजे, संजय तुरडे, तृप्ती विश्वासराव, अमेय घोळे, अनिल कोकीळ, नाना अंबोले यांना शिंदेसेनेने उमेदवारी दिली आहे.