हरित कवच घटल्याने मुंबईत पूरस्थिती निर्माण झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 03:48 PM2020-08-29T15:48:17+5:302020-08-29T15:50:53+5:30

हरित कवचामध्ये ४२.५ टक्क्यांची घट झाली

The fall of the green armor created a backlash in Mumbai | हरित कवच घटल्याने मुंबईत पूरस्थिती निर्माण झाली

हरित कवच घटल्याने मुंबईत पूरस्थिती निर्माण झाली

Next

 

मुंबई : गेल्या तीन दशकांमध्ये मुंबईभोवतलच्या हरित कवचामध्ये ४२.५ टक्क्यांची घट झाली आहे. १९८८ मध्ये मुंबईच्या एकूण ६३,०३५ हेक्टर या क्षेत्रफळामध्ये २९,२६० हेक्टरचे हरित कवच होते. जे २०१८ मध्ये १६,८१४ हेक्टर इतकेच राहिले आहे. ३० वर्षांमध्ये १२,४४६ हेक्टर परिसरावरील हरित कवच नष्ट झाले आहे. हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापेक्षा मोठा आहे. हे कवच नष्ट झाल्यामुळे मुंबईचे तापमान वाढले आहे. कार्बन उत्सर्जन वाढले आहे. आणि पूर परिस्थितीमध्ये मोठी वाढ झाली आहे. जागतिक तापमान वाढ, अनियोजित विकास आणि हरित कवचाचे प्रमाण कमी होणे यामुळेच सध्या मुंबईत अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण झाली आहे.

स्प्रिंगर नेचर मुंबई या जर्नलने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार नमूद करण्यात आलेली माहिती देण्यात आल्याचे  पर्यावरण तज्ञांनी सांगितले. पुरापासून मुंबईचा बचाव करण्यासाठी इथली खारफुटी प्रचंड महत्त्वाची मानली जाते. त्याचबरोबर कार्बन उत्सर्जन शोषण्याचेही ती काम करते. द बेनिफिट्स ऑफ फ्रिंजिंग मॅनग्रूव्ह सिस्टिम्स टू मुंबई या अभ्यासानुसार विकास प्रकल्पांमुळे खारफुटी नष्ट होण्याची मोठी भीती आहेच. अशा परिस्थितीत एमएमआर क्षेत्रातील विकासादरम्यान खारफुटीचे संरक्षण करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
 
मुंबईतील पाणथळ भागाच्या संरक्षणासाठी कायद्याचा आधार कसा घेता येईल यावर चर्चा करण्यासाठी एका व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पर्यावरणवादी, मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आणि शहरातील कायद्याचे विद्यार्थी एकत्र आले होते. निमित्त होते ते  वातावरण फाउंडेशनच्या वतीने बायोडायव्हर्सिटी बाय द बे या अभियाना अंतर्गत आयोजित वेबिनारचे. यावेळी पर्यावरणवादी स्टॅलिन दयानंद, वकील गायत्री सिंह, वकील झमान अली यांनी मुंबईतील सध्याच्या पाणथळ भागांचे व्यवस्थापन व संरक्षण आणि शाश्वत अशी धोरणे तयार करण्यासाठी कायद्यातील कोणत्या गोष्टींचा आधार घेता येईल याची चर्चा केली.

स्टॅलिन दयानंद म्हणाले, या कार्यक्रमामुळे भावी पिढीतील वकिलांना पर्यावरणासंबंधीचे कायदे आणि त्यापुढील आव्हाने खूप चांगल्या पद्धतीने समजतील. आज आपल्या देशात जे काही जैव विविधता बाकी आहे त्याचे संरक्षण न्याय व्यवस्थाच करू शकते. मुंबईचा नैसर्गिक वारसा, नैसर्गिक संपत्ती अतिशय गतीने लुप्त होत चालली आहे. तरुणाईने विशेषत: तरुण वकिलांनी कृतिशीलपणे आणि संरक्षणाबद्दल व्यवस्थित माहिती घेऊन पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे.

वातावरण फाउंडेशनचे संस्थापक भगवान केशभाट यांनी सांगितले की, विकासाचे स्वागतच आहे पण पर्यावरणाचा बळी देऊन तो व्हायला नको. आपल्या भोवतालच्या जैवविविधतेकडे आपण कानाडोळा केला तर त्याची किंमत आपल्या भावी पिढीला मोजावी लागेल. आता मुंबईत दरवर्षी मान्सूनमध्ये पूर येणारच हे गृहितच झाले आहे. आपण आताच कृती केली नाही तर नंतर खूप उशीर होईल. पर्यावरणासंबंधी प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आणि त्यांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी आम्ही राजकारणी, सनदी अधिकारी आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांसोबत काम करण्यास तयार आहोत.

Web Title: The fall of the green armor created a backlash in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.