घरातून सुरू होते बनावट आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर, पाच जणांना अटक; मुलुंड पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 12:52 IST2025-11-13T12:51:27+5:302025-11-13T12:52:23+5:30
Crime News: मुलुंड पोलिसांनी मुलुंड कॉलनीतील एका निवासी अपार्टमेंटमधून चालणाऱ्या बनावट आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. अमेरिकन वित्तीय संस्थेचे अधिकारी असल्याचे भासवून अमेरिका आणि कॅनडामधील नागरिकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

घरातून सुरू होते बनावट आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर, पाच जणांना अटक; मुलुंड पोलिसांची कारवाई
मुंबई - मुलुंड पोलिसांनी मुलुंड कॉलनीतील एका निवासी अपार्टमेंटमधून चालणाऱ्या बनावट आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. अमेरिकन वित्तीय संस्थेचे अधिकारी असल्याचे भासवून अमेरिका आणि कॅनडामधील नागरिकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मुलुंड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय जोशी यांना अमेरिकेतील लेंडिंग पॉइंट या वित्तीय कंपनीचे प्रतिनिधित्व असल्याचे भासवून चार जण बनावट कॉल सेंटर चालवत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. आरोपी परदेशी नागरिकांशी संपर्क साधत होते, त्वरित कर्ज देत होते आणि कर्ज मंजुरीच्या बहाण्याने ९० ते १५० डॉलरपर्यंतचे ‘प्रक्रिया शुल्क’ वसूल करीत होते.
मिळालेल्या माहितीच्या आधारे निरीक्षक शिवाजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने ११ नोव्हेंबर रोजी संबंधित ठिकाणी छापा मारला. कारवाईदरम्यान, पोलिसांना आढळून आले की मुख्य आरोपी सागर राजेश गुप्ता (२७) याने मुलुंड येथील अभिषेक सूर्यप्रकाश सिंग (२८) आणि लखीसराय, बिहार येथील तन्मय कुमार रजनीश धाडसिंग (२७) यांच्या मदतीने बेकायदेशीर कॉल सेंटर सुरू केले होते.
फसवणुकीच्या कामासाठी चार ऑपरेटर नियुक्त
आरोपी आंतरराष्ट्रीय ई-सिम कार्ड वापरून परदेशातील पीडितांना संदेश आणि व्हॉइस मेल पाठवून, लेंडिंग पॉइंटच्या नावाखाली त्वरित कर्ज देण्याचा दावा करीत होते. पीडितांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी समान अर्ज क्रमांकांसह बनावट कर्ज मंजुरी कागदपत्रेदेखील जारी केली. कॉल सेंटरने त्यांच्या फसव्या कारवायांसाठी चार ऑपरेटर नियुक्त केले होते. छापेमारीत पोलिसांनी २ लॅपटॉप, ११ मोबाइल, २ राउटर व ७६ हजार रुपये रोख जप्त केले. आरोपींकडे कॉल सेंटर चालवण्यासाठी आवश्यक असलेले कोणतेही अधिकृत परवाने नसल्याचेही आढळून आले.
अपार्टमेंट सील
सुरत येथील प्रशांत राजपूत नावाच्या व्यक्तीने आरोपीला अमेरिकन डॉलर गिफ्ट कार्ड भारतीय चलनात रूपांतरित करण्यात मदत केल्याचेही तपासात समोर आले. त्याचा आणि या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पाचही आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत आणि बनावट कॉल सेंटर चालविण्यासाठी वापरण्यात येणारे अपार्टमेंट सील करण्यात आले आहे.