Join us
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कंपन्या केल्या स्थापन, ‘हीरो’च्या मालकावर ईडीचे छापे; मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 14:03 IST

दिल्लीतील त्यांचे घर तसेच गुरगाव येथील कार्यालय असे त्यांच्याशी संबंधित किमान पाच ते सहा ठिकाणी छापेमारी केल्याचे समजते.

मुंबई : गेल्या वीस वर्षांपासून देशात दुचाकी निर्मिती व विक्रीमध्ये अग्रगण्य असलेल्या हीरो मोटोकॉर्प कंपनीचे अध्यक्ष पवन मुंजाळ यांच्या घर तसेच कार्यालयांवर मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापेमारी केली. दिल्लीतील त्यांचे घर तसेच गुरगाव येथील कार्यालय असे त्यांच्याशी संबंधित किमान पाच ते सहा ठिकाणी छापेमारी केल्याचे समजते.

उपलब्ध माहितीनुसार, मुंजाळ यांच्याविरोधात दाखल असलेले प्रकरण हे केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेशी संबंधित असून या प्रकरणाच्या अनुषंगाने ईडीने ही छापेमारी करत मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. मुंजाळ यांच्या एका निकटवर्तीयाला अलीकडेच मोठ्या प्रमाणावार परदेशी चलनासह दिल्ली विमानतळावर पकडण्यात आले होते. या चलनाची रक्कम संबंधित व्यक्तीने घोषित केली नव्हती. 

या प्रकरणाचा धागा पकडून ही छापेमारी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, जूनमध्ये कॉर्पोरेट मंत्रालयाने देखील हीरो कंपनीमध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्सशी निगडित काही मुद्दे उपस्थित केले होते, तर कंपनीने बनावट कंपन्या स्थापन करून पैशांची फिरवाफिरवी केल्याचा देखील आरोप झाला होता. याखेरीज मार्च २०२२ मध्ये कंपनीने करचोरी केल्याचा ठपका ठेवत आयकर विभागाने देखील छापेमारी केली होती.

टॅग्स :अंमलबजावणी संचालनालयधाडमुंबई