Join us  

हे चाललंय ते भयानक, सोमैय्यांवरील कारवाईनंतर फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 1:30 PM

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं असेल की, एखादा व्यक्ती म्हणतो मी भ्रष्ट्राचाराविरुद्ध तक्रार करायला जातो आणि पोलिस त्याला अडवतात.

ठळक मुद्देहे जे चाललंय ते भयानक आहे, पण भारतीय जनता पार्टी येथे थांबणार नाही. भ्रष्टाचाराविरुद्धची भाजपची लढाई सुरूच राहिल, असेही फडणवीस यांनी म्हटले. असं असू शकतं, कदाचित मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल आणि थेट गृहमंत्रालयाने केली असेल.

मुंबई - भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी ओगलेवाडी येथील रेल्वे स्टेशनवर ताब्यात घेतले आहे. आज मंगळवार रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास ते कोल्हापूरकडे जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना शासकीय विश्रामगृहाकडे नेण्यात आले. त्यानंतर, किरीट सोमैय्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना सवाल केला. तसेच, मंत्री हसन मुश्रिफ आणि त्यांच्या जावयावर भ्रष्ट्राचाराचे आरोपही केले. आता फडणवीस यांनी सोमैय्यांवरील कारवाई चुकीची असल्याचं म्हटलंय. तसेच, मुख्यमंत्र्यांनी ही कारवाई का थांबवली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.  

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं असेल की, एखादा व्यक्ती म्हणतो मी भ्रष्ट्राचाराविरुद्ध तक्रार करायला जातो आणि पोलिस त्याला अडवतात. विशेष म्हणजे कारण हे सांगितलं जातं की, ज्यांच्याविरुद्ध तुम्हाला तक्रार करायची आहे, त्यांचे कार्यकर्ते दंगा करतील, म्हणून तुम्हाला जाता येणार नाही. स्वतंत्र भारतात अशी कायदा-सुव्यवस्था कधीच पाहायला मिळाली नसेल, महाराष्ट्रात तर नाहीच नाही, असे म्हणत किरीट सोमैय्या यांच्यावरील कारवाई चुकीची असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. 

हे जे चाललंय ते भयानक आहे, पण भारतीय जनता पार्टी येथे थांबणार नाही. भ्रष्टाचाराविरुद्धची भाजपची लढाई सुरूच राहिल, असेही फडणवीस यांनी म्हटले. असं असू शकतं, कदाचित मुख्यमंत्र्यांना माहिती नसेल आणि थेट गृहमंत्रालयाने केली असेल. पण, मुख्यमंत्र्यांनी ही कारवाई थांबवली पाहिजे, ही चुकीची कारवाई आहे, असेही ते म्हणाले. तसेच, भाजपाकडून ऑफर देण्यात आली होती का? या प्रश्नावर, आमचे ऑफर लेटर काय मैदानात पडलेत का, कोणालाही देण्याकरिता, असे म्हणत फडणवीसांनी मुश्रीफ यांना ऑफर दिली नसल्याचे सांगितले.

१०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार

किरीट सोमय्या यांनी संपूर्ण माहिती घेऊन भाष्य करावं. त्यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. सोमय्यांच्या आरोपाने भाजपाची प्रतिमा मलिन होतेय. किरीट सोमय्यांनी हवी तिथं खुशाल चौकशी करावी. महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठीच भाजपाकडून वारंवार आरोप लावले जात आहेत. सोमय्यांना कारखान्याचं नाव सुद्धा वाचता येत नाही. आयकर विभागाने दोन वर्षापूर्वीच चौकशी केली आहे. किरीट सोमय्यांना काहीही माहिती नाही, कुठलेही पुरावे नसताना आरोप केल्यामुळे १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा कोर्टात दाखल करणार असल्याचा इशारा मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे.

भाजपाकडून मला वारंवार ऑफर

माझ्यावर सातत्याने होत असलेल्या आरोपाच्या मागे भाजपचं मोठं षडयंत्र असून याचे मास्टरमाईंड हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आहेत. पाटील ज्या प्रदेशाचं प्रतिनिधित्व करतात, तेथे भाजपा भुईसपाट झालीय आणि ती मीच भुईसपाट केलीय. मला भाजपाकडून वारंवार ऑफर देण्यात आल्या. पण, मी पवार एके पवार अशी भूमिका घेतल्यानेच जाणीवपूर्वक हे कट कारस्थान करण्यात येत असल्याचं मुश्रिफ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं.  

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमुंबईकिरीट सोमय्याउद्धव ठाकरेमुख्यमंत्री