Join us  

संकटकाळात राजकारण करण्याऐवजी राज्याला मदत मिळवून देण्यासाठी फडणवीसांनी प्रयत्न करावेत, काँग्रेसचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 5:09 PM

देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यपालांची यांची भेट घेऊन मुंबईत कोरोनाच्या रुग्णांना योग्य त्या सुविधा मिळत नाहीत, बेड उपलब्ध नाहीत, लोकांची उपासमारही होत आहे असे आरोप सरकारवर केले. राज्यात लोकनियुक्त सरकार असताना फडणवीस वारंवार राज्यपालांकडे जाऊन महाराष्ट्र विकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुंबई -  कोरोना महामारीच्या अभूतपूर्व संकटकाळात सरकार, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासन सर्वजण मिळून लढत आहेत. पण विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस मात्र रोज राजभवनावर जाऊन सरकार विरोधात राज्यपालांना निवेदने देऊन राजकारण करत आहेत. या संकट काळात राजकारण न करता राज्याला केंद्र सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी फडणवीस पुढाकार का घेत नाहीत? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे.यासंदर्भात लोंढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यपालांची यांची भेट घेऊन मुंबईत कोरोनाच्या रुग्णांना योग्य त्या सुविधा मिळत नाहीत, बेड उपलब्ध नाहीत, लोकांची उपासमारही होत आहे असे आरोप सरकारवर केले. राज्यात लोकनियुक्त सरकार असताना फडणवीस वारंवार राज्यपालांकडे जाऊन महाराष्ट्र विकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यावर संकट असतानाही भाजपाला राजकारणाशिवाय काही सुचत नाही. जीएसटीमुळे राज्याचे महसुली स्रोत आटले आहेत. जीएसटी, केंद्राच्या विविध योजनांचे अनुदान व इतर करांच्या रुपाने मिळणारे जवळपास २१ हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम केंद्राकडून महाराष्ट्राला येणे बाकी आहे. राज्याला निधीची आवश्यकता असताना देवेंद्र फडणवीस यांनी मोदींकडे आपले वजन खर्च करून राज्याच्या हिश्याचे पैसे मिळवून द्यावेत. महाराष्ट्राच्या भल्यासाठी आपण काही विधायक काम केले असते तर आपली राज्यातील प्रतिमाही उंचावली असती व ती मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या व्यक्तीला साजेशी ठरली असती परंतु असे न करता फक्त विरोधासाठी विरोध करण्यात आपण वेळ घालवत आहात हे दुर्देवी आहे.देवेंद्र जी आपण व आपल्या पक्षाचे आमदार, खासदार महाराष्ट्रात मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पैसे न देता पीएम केअर्सला पैसे देतात याचा अर्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊ नका असा होतो. कोल्हापूर, सातारा, सांगलीला महापूर आला तेंव्हा आपण मुख्यमंत्री होतात. लाखो हेक्टरवरील पीके वाया गेली, हजारो जनावरे वाहून गेली, लोकांचे जीवन उद्ध्वस्थ झाले त्यावेळी आपण काय केले? मोदींची समजूत घालून संकट टाळता असते पण तुम्ही महाजनादेश यात्रेत व्यस्त होता. शरद पवार साहेबांनी केंद्राला पत्र पाठविले तेव्हा हा प्रश्न सुटला. आपण असा प्रयत्न न करता फक्त आणि फक्त राजकारण करत राहिलात.

भाजपाच्या ट्वीटरवर जुना व्हिडिओ टाकून क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्णांना सुविधा मिळत नाहीत असा आरोप आपल्या पक्षाने केला, फसगत झाल्यावर तुम्ही माघार घेतली हे लोकांच्या नजरेतून सुटलेले नाही, देवेंद्र फडणवीसजी तुमचे सध्याचे वागणे म्हणजे रोम जळत असताना निरो बासरी वाजवत होता असेच आहे, असे लोंढे म्हणाले. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकाँग्रेसदेवेंद्र फडणवीसभाजपाराजकारण