Join us

भाजपला फायद्याच्या आघाड्या नको, पवारांच्या सूचनेवर फडणवीस म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 16:30 IST

शरद पवार यांच्या या सूचनेमुळे राष्ट्रवादी किंवा शिवसेना दोन्हीपैकी एक पक्ष भाजपसोबत जाईल का? या चर्चांना पूर्णपणे विराम मिळाला आहे. पवार यांच्या या सूचनात्मक माहितीबद्दल देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आलं.

ठळक मुद्देसरकारने ते करायचं की नाही हे त्यांनी ठरवायचं. पण, आमची भूमिका ठाम असणार आहे, जर त्याशिवाय निवडणुका घेण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही तीव्र आंदोलन करू, असे फडणवीस यांनी म्हटले.

मुंबई - जिथे फायदा होईल त्या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी आघाडी करा; मात्र कोणत्याही परिस्थितीत भाजपला फायदा होईल, अशा पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाड्या करू नका, अशा स्पष्ट सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी दिल्या आहेत. यासंदर्भात भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावर, फडणवीसांनी सहजतेनं उत्तर दिलं.  

शरद पवार यांच्या या सूचनेमुळे राष्ट्रवादी किंवा शिवसेना दोन्हीपैकी एक पक्ष भाजपसोबत जाईल का? या चर्चांना पूर्णपणे विराम मिळाला आहे. पवार यांच्या या सूचनात्मक माहितीबद्दल देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आलं. त्यावेळी, ओबीसींचं आरक्षण मिळाल्याशिवाय कुठलिही स्थानिक स्वराज संस्थांची निवडणूक होता कामा नये, असं आमचं ठाम मत आहे. यासंदर्भात आम्ही फॉर्म्युलाही सांगितला आहे. सरकारने ते करायचं की नाही हे त्यांनी ठरवायचं. पण, आमची भूमिका ठाम असणार आहे, जर त्याशिवाय निवडणुका घेण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही तीव्र आंदोलन करू, असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच, शरद पवारांच्या प्रश्नावर ते म्हणतायंत तो त्यांच्या पक्षाच विषय आहे, असे म्हणत फडणवीस यांनी सहजच उत्तर दिलं. 

पवारांनी घेतली राष्ट्रवादीची बैठक

पवार यांनी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक घेतली. बैठकीत पवार यांनी मंत्र्यांच्या कामाचा आणि त्यांच्या विभागाचा आढावा घेतला. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका करण्याला ठाम विरोध केला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ओबीसींचे आरक्षण दिल्याशिवाय या निवडणुका होणार नाहीत, या भूमिकेवर ठाम राहिले पाहिजे, असे सांगून पवार म्हणाले, ‘‘निवडणुकीत निश्चित अशी रणनीती आखूनच सामोरे गेले पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीत भाजपला फायदा होईल अशी कृती आपल्याकडून होऊ नये, यासाठी बारकाईने नियोजन करा. 

ईडीच्या कारवाया हा भाजपचा कट

ईडीच्या कारवाईवरून बैठकीत फारशी चर्चा झाली नाही; मात्र भाजपकडून मुद्दाम कट करून कारवाया सुरू आहेत. यावर कायदेशीर लढा आपल्याकडून दिला जात आहे. तिन्ही पक्ष भाजपच्या या कटाविरुद्ध आवाज उठवण्यास सक्षम आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले. महामंडळाच्या नेमणुकांविषयी चर्चा झाली असून, येत्या १५ दिवसात महामंडळाची नावे जाहीर केली जातील, असे यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसशरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसभाजपानिवडणूक