Fadnavis, Pawar and others pay tribute to Sena supremo Bal Thackeray on his death anniversary | हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सातवा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सातवा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली

ठळक मुद्दे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज (रविवार) सातवा स्मृतिदिन आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांना ट्विटरवरून आदरांजली वाहिली आहे.शिवसेनेचे नेते संजय राऊत, अरविंद सावंत, गजानन कीर्तिकर यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली.

मुंबई - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज (रविवार) सातवा स्मृतिदिन आहे. बाळासाहेबांच्या विचारांतून मराठी माणसाला कायम स्फूर्ती मिळत राहते. स्मृतिदिनाच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो शिवसैनिक शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर दाखल झाले आहेत.

स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून स्मृतिस्थळावर जोरदार तयारी करण्यात आली आहे. शिवसैनिकांसोबत अनेक राजकीय पक्षांचे नेतेही शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला भेट देणार आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांना ट्विटरवरून आदरांजली वाहिली आहे. 'स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र आदरणीय बाळासाहेबांनी आपल्या सर्वांना दिला!' असं म्हणत फडणवीस यांनी व्हिडिओ ट्विट करुन आदरांजली वाहिली आहे. 

शिवसेनेचे नेते संजय राऊत, अरविंद सावंत, गजानन कीर्तिकर यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर राज्यभरातून शिवसैनिकांचा जथ्था रविवारी धडकणार आहे. राज्यातील सत्तेचा संघर्ष चिघळलेला असल्याने या वेळच्या स्मृतिदिनाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेनेचे आमदार, खासदार, माजी मंत्री, पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाळासाहेबांना अभिवादन करणार आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. 'प्रादेशिक अस्मितेचा हुंकार स्वाभिमानाने मिरवणारा मराठी माणूस स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केला. समाजकारणाला अग्रक्रम देणारं राजकारण, अमोघ वक्तृत्व, रोखठोक स्वभाव यामुळेच त्यांना अनुयायांचं निरपेक्ष आणि चिरंतर प्रेम मिळालं. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन!' असं ट्विट पवार यांनी केलं आहे.  

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेतर्फे रविवारी शक्तिप्रदर्शनाची संधी साधण्यात येणार आहे. राज्यातील भाजपच्या सत्तेचा मार्ग शिवसेनेने अडवून ठेवल्याने सत्तेच्या नाड्या शिवसेनेच्या हातात आल्या आहेत. मात्र अद्याप शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झालेला नसल्याने शिवसेना या स्मृतिदिनाच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करीत आपली ताकद दाखवण्याची संधी सोडणार नाही, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

शिवसेनेला कमकुवत पक्ष समजणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी शिवसैनिकांनी पूर्ण ताकद पक्षाच्या मागे उभी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवून बाळासाहेबांना अभिवादन करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. शिवसेनेला त्यांचा मुख्यमंत्री 17 नोव्हेंबरपूर्वी बसविण्याचा प्रयत्न होता; मात्र राजकीय परिस्थितीत तो पूर्ण झालेला नसल्याने शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून संदेश पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Web Title: Fadnavis, Pawar and others pay tribute to Sena supremo Bal Thackeray on his death anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.