मुंबई : आॅक्टोबर २०१४ ते मे २०१९ या कालावधीत मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टर, चॉपर, खासगी जेट विमानाच्या वाहतुकीसाठी तब्बल ५७ कोटी ६२ लाख १८ हजार रुपये खर्च आला आहे. माहिती अधिकारात ही माहिती नितीन यादव यांना मुख्यमंत्री सचिवालयातून देण्यात आली आहे.
राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांना अनेकवेळा विमान अथवा हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागतो. सरकारकडे स्वत:च्या मालकीचे छोटे विमान आणि हेलिकॉप्टर आहे. गेल्या साडेचार वर्षात या हेलिकॉप्टरमध्ये वारंवार बिघाड झाले. तर चारवेळा स्वत: मुख्यमंत्री बालंबाल बचावले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या प्रवासासाठी खासगी जेट विमानाचा वापर करण्यात आला. सर्वात जास्त म्हणजे २० कोटी २० लाख रुपये खर्च २०१८-१९ या वर्षात झाल्याचे यातून स्पष्ट होत आहे. २०१७-१८ या वर्षातला खर्च हेलिकॉप्टर भाड्याने घेतल्यामुळे आला आहे. तर याच वर्षात १३ कोटी २४ लाखाचा खर्च हा विमान आणि पायलट यांच्यावरील आहे असेही या माहितीत नमूद करण्यात आले आहे.