Eye Infections: मुंबईत वाढताहेत संसर्गाचे रुग्ण; डोळ्यांत डोळे घालाल तर पस्तावाल, 'अशी' घ्या काळजी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 14:50 IST2025-11-19T14:49:09+5:302025-11-19T14:50:46+5:30
Eye Infection Alert: शहरात गेल्या काही दिवसांपासून डोळ्यांच्या संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत.

Eye Infections: मुंबईत वाढताहेत संसर्गाचे रुग्ण; डोळ्यांत डोळे घालाल तर पस्तावाल, 'अशी' घ्या काळजी!
मुंबई: शहरात गेल्या काही दिवसांपासून डोळ्यांच्या संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. बदलत्या वातावरणामुळे हा आजार पसरत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. हवामानातील आर्द्रता, धूळकणांची वाढ, तसेच पावसाळ्यानंतर अचानक वाढलेले तापमान यांमुळे डोळ्यांवर ताण येतो आणि संसर्गाचा धोका वाढतो. शहरातील अनेक नागरिकांना डोळे लाल होणे, खाज येणे, पाणी वाहणे आणि सूज, अशी लक्षणे जाणवत आहेत.
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले की, या वातावरणात काही प्रमाणात डोळ्यांच्या संसर्गाची प्रकरणे दिसतात. मात्र त्याला साथ म्हणता येणार नाही. तसेच अधिक प्रमाणात डोळ्यांच्या संसर्गाची प्रकरणे मुंबई शहर व उपनगरांमध्ये दिसत असल्याची माहिती उपलब्ध नाही.
औषधोपचार असे करा...
डॉक्टरांनी दिलेले आयड्रॉप्स वेळेवर वापरा. स्वतःहून स्टेरॉइड किंवा अँटिबायोटिक आयड्रॉप सुरू करू नका. चुकीच्या औषधामुळे त्रास वाढू शकतो. कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असल्यास लेन्स तत्काळ बंद करा आणि पूर्णपणे बरे होईपर्यंत वापरू नका. लेन्स केससुद्धा स्वच्छ करा किंवा बदला.घरात आजार पसरू नये म्हणून मुलांना किंवा इतर कुटुंबीयांचा जवळून संपर्क टाळा. उशीचे कव्हर, टॉवेल रोज बदला. वातावरण बदलांचा हा परिणाम आहे. पूर्वीपेक्षा डोळ्याच्या संसर्गाचे रुग्ण आता ओपीडीमध्ये दिसू लागले आहेत. हा संसर्ग प्रामुख्याने विषाणूजन्य असून संपर्कातून सहज पसरतो. त्यामुळे वैयक्तिक स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी साथ आल्यासारखी परिस्थिती नाही.- डॉ. शशी कपूर, नेत्ररोगतज्ज्ञ
'अशी' घ्यावी काळजी...
स्वच्छता सर्वांत महत्त्वाची आहे. डोळे स्वच्छ, उकळून थंड केलेल्या पाण्याने दिवसातून दोन ते तीन वेळा हलक्या हाताने धुवा. हात वारंवार साबणाने धुवा, डोळे चोळू नका. त्यामुळे संक्रमण वाढू शकते. वेगळा टॉवेल व रुमाल वापरा, तुमच्या वापरायच्या वस्तू (टॉवेल, उशी, रुमाल) इतरांपासून वेगळ्या ठेवा. घरातील इतरांनी तुमच्या डोळ्याला हात लावू नये. सनग्लासेस वापरा, बाहेर जाताना सनग्लासेस लावल्यास प्रकाशाची संवेदनशीलता कमी होते आणि इतरांना संक्रमण होऊ नये म्हणूनही मदत होते. स्क्रीन टाइम कमी ठेवा (मोबाइल / टीव्ही / लॅपटॉप) , पुरेशी झोप घ्या, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.