लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सांताक्रुझ येथील एका बांधकाम व्यावसायिकाला कुटुंबासह ठार मारण्याची धमकी देऊन ११ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी सांताक्रुझ पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. फोनवरून धमकी देणाऱ्याने अमेरिकी डॉलर्स आणि सोन्याच्या स्वरूपात खंडणी मागितल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या ४७ वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, ३ जानेवारीला सायंकाळी एका अनोळखी मोबाईल नंबरवरून त्यांना धमकीचा फोन आला. फोन करणाऱ्याने आपले नाव मनजीत असल्याचे सांगितले आणि व्यावसायिकाच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली. “जिवंत राहायचे असेल तर दोन कोटी रोख, चार कोटींचे अमेरिकी डॉलर्स आणि सात ते आठ किलो सोने अशा ११ कोटी रुपयांच्या ऐवजाची खंडणी मागितली. पोलिसांनी अनोळखी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.