किरीट सोमय्यांकडे ५० लाखांच्या खंडणीची मागणी; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
By मनीषा म्हात्रे | Updated: September 25, 2023 19:01 IST2023-09-25T18:59:49+5:302023-09-25T19:01:37+5:30
नवघर पोलिसांनी सोमय्या यांच्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्ती विरोधात रविवारी खंडणीचा गुन्हा नोंदवला आहे.

किरीट सोमय्यांकडे ५० लाखांच्या खंडणीची मागणी; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून ५० लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी नवघर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार, नवघर पोलिसांनी सोमय्या यांच्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्ती विरोधात रविवारी खंडणीचा गुन्हा नोंदवला आहे.
सोमय्या यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी त्यांच्या कार्यालयातील मेल अकाउंट तपासात असताना त्यावर ऋषिकेश शुक्ला नावाच्या ईमेल आयडीवरून ५० लाखांची मागणी करणारा मेल आल्याचे दिसून आले. एका अज्ञात व्यक्तीने त्यांचा कथित अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. मेलमध्ये आधीचा व्हिडीओ हा फक्त ट्रेलर असून पिक्चर बाकी असल्याचेही म्हंटले आहे. आरोपीने वृत्त वाहिनीवर प्रसारित केलेल्या व्हिडिओच्या आधारेच त्यांना धमकावलेले दिसून आले.
सोमय्या यांच्या संदर्भातील अश्लील आणि आक्षेपार्ह चित्रफीत प्रसारित केल्याबद्दल मराठी वृत्तवाहिनीवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून तीन दिवसांची बंदी घालण्यात आली होती. याप्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असताना आता सोमय्या यांनाच खंडणीसाठी ईमेल आल्याने खळबळ उडाली आहे. नवघर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून सायबर पोलीसही याबाबत समांतर तपास करत आहे.