धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात; शेल कंपन्यांत खंडणीची रक्कम वळवल्याचा आरोप, कोर्टात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 06:58 IST2025-01-29T06:57:15+5:302025-01-29T06:58:07+5:30

आरटीआय कार्यकर्ते केतन तिराेडकर यांचा याचिकेत आराेप.

Extortion amount in Dhananjay Munde shell companies | धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात; शेल कंपन्यांत खंडणीची रक्कम वळवल्याचा आरोप, कोर्टात याचिका

धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात; शेल कंपन्यांत खंडणीची रक्कम वळवल्याचा आरोप, कोर्टात याचिका

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मंत्री धनंजय मुंडे यांच्या अनेक शेल कंपन्या असून, खंडणीची रक्कम या कंपन्यांमध्ये वळती केल्याचा गंभीर आरोप करीत या प्रकरणाचा तपास थेट उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चालावा आणि ईडीनेही याप्रकरणी समांतर तपास करावा, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. एसआयटीने खोलवर तपास केल्यास मंत्र्यावर मकोकामधील कलम ३ (५) अंतर्गत शिक्षा होऊ शकते, असेही याचिकेत नमूद केले आहे.

आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी ही याचिका दाखल केली असून, त्यावर बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. शेल कंपन्यांमध्ये गुंतविण्यात आलेली रक्कम कुठून आली, याचा सखोल तपास करण्यात यावा. याप्रकरणी मनी लाँड्रिंग झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्यांनी याचिकेत म्हटले आहे.

परळी वैजनाथ येथील व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिस प्रा. लि.मध्ये धनंजय मुंडे, त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे आणि वाल्मीक कराड व अन्य काही व्यक्ती संचालक आहेत. एसआयटी वाल्मीक कराडने केलेल्या गुन्ह्यांचा तपास करत आहे. मात्र, हा तपास जेव्हा कॅबिनेट मंत्र्यांच्या दारापर्यंत येतो तेव्हा तपास थांबविला जातो, असा आरोप तिरोडकर यांनी याचिकेद्वारे केला आहे. बीडच्या पोलिस अधीक्षकांना तपास अहवाल सादर करण्याचे निर्देश द्यावेत, तसेच निवडणूक आयोगाला ही याचिका आणि मुंडे यांनी आयोगापुढे दाखल केलेले प्रतिज्ञापत्र पडताळून कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे.

धनंजय मुंडेंवरील आरोप काय?
व्यंकटेश्वर इंडस्ट्रियलच्या कार्यालयात वाल्मीक कराडचे बेकायदा धंदे सुरू असतात. तेथूनच त्याने आवादा या पवनऊर्जा निर्मिती करणाऱ्या कंपनीकडून दोन कोटी रुपयांची लाच मागितली. या कंपनीचे संचालक धनंजय मुंडेही आहेत. जगमित्र साखर कारखान्याचेही संचालक वाल्मीक कराड, धनंजय मुंडे व अन्य काही लोक असून, या कारखान्याच्या कार्यालयाची जागा धनंजय मुंडे यांच्या नावावर खरेदी करण्यात आली आहे.

व्यंकटेश्वर इंडस्ट्रियलने दि. ७ ऑक्टोबर २०२२ रोजी १७ लाख ८० हजार इक्विटी शेअर्स सहसंचालक राजेश घनवट यांना विकून १ करोड ७८ लाख रुपयांचा निधी उभा केला. राजेश घनवट हे धनजंय मुंडे यांचे निकटवर्तीय असून, ते मुंबईतील मालाड येथे मुंडे यांच्या नावावर असलेल्या फ्लॅटमध्येच राहतात. त्यानंतर दि. २० सप्टेंबर २०२२ रोजी घनवट यांना कंपनीचे ४० लाख शेअर्स चार कोटी रुपयांना विकण्यात आले. ही रक्कम घनवट यांच्या एका खासगी कंपनीचे शेअर्स विकून उभी करण्यात आली. वास्तविक ही रक्कम कराडने खंडणीद्वारे मिळवलेली आहे. मात्र, त्यावर्षीच्या ताळेबंदात चार कोटी २६ लाख ७९ हजार १६२ रुपये ‘अनसेक्युअर लोन’ म्हणून दाखविण्यात आले. कोणतीही मालमत्ता गहाण न ठेवता हे कर्ज घेण्यात आले आहे. 

आदित्य आणि अजिंक्य ॲग्रो प्रा. लि., टर्टल लॉजिस्टिक्स इंडिया प्रा. लि., ॲक्सिओम मल्टी युटिलिटी सर्व्हिस प्रा. लि., परळी डेअरी प्रा. लि. आणि यशोधन सर्व्हिस एलएलपी या कंपन्यांत धनंजय मुंडे यांचे आर्थिक हित आहे. त्यापैकी परळी डेअरीमध्ये राजश्री या सहसंचालक आहेत. 

लाखाे रुपयांची सेवा
व्यंकटेश्वर इंडस्ट्रिजला सेवा पुरविल्याबद्दल पत्नीच्या वतीने धनंजय मुंडे यांनी कंपनीकडून २०२१ मध्ये १६ लाख ४४ हजार २२० रुपये आणि २०२२ मध्ये २४ लाख रुपये घेतले. मात्र, या कंपनीचा उल्लेख निवडणूक आयोगात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नाही. दि. १ नोव्हेंबर २०२१ रोजी धनंजय मुंडे यांनी पत्नीसह कंपनीच्या ठरावावर संचालक म्हणून सही केली आहे, असा आराेप याचिकेत आहे.

Web Title: Extortion amount in Dhananjay Munde shell companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.