दोन डबे साेडून एक्स्प्रेस धावली, दोनदा तुटले कपलिंग; ४० मिनिटे वाहतूक ठप्प, प्रवाशांमध्ये घबराट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 11:17 IST2025-09-29T11:16:41+5:302025-09-29T11:17:15+5:30
पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसवरून निघालेल्या अमृतसर एक्स्प्रेसच्या शेवटच्या दोन सेकंड एसी डब्यांचे कपलिंग डहाणू स्थानकाजवळ तुटले.

दोन डबे साेडून एक्स्प्रेस धावली, दोनदा तुटले कपलिंग; ४० मिनिटे वाहतूक ठप्प, प्रवाशांमध्ये घबराट
मुंबई / बोर्डी : पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसवरून निघालेल्या अमृतसर एक्स्प्रेसच्या शेवटच्या दोन सेकंड एसी डब्यांचे कपलिंग डहाणू स्थानकाजवळ तुटले. मुख्य गाडी पुढे गेल्याने काही काळ प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली.
दुपारी १ वाजून २० मिनिटांच्या सुमारास डहाणू रोड स्थानकादरम्यान कपलिंग तुटले. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक तब्बल ४० मिनिटे ठप्प झाली. डबे जोडल्यानंतर एक्स्प्रेस अमृतसरच्या दिशेने रवाना झाली. दरम्यान, संजान स्टेशनजवळ पुन्हा कपलिंग तुटले. त्यानंतर वलसाड येथे ट्रेनचे डबे बदलण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. पश्चिम रेल्वेचे वाणगाव रेल्वेस्थानक सोडून अमृतसर एक्स्प्रेस डहाणू रोड स्थानकाच्या दिशेने जात असताना शेवटच्या दोन डब्यांचे कपलिंग तुटले. त्यामुळे दोन डबे मागेच सोडून एक्स्प्रेस पुढे गेल्याने प्रवाशांमध्ये भीती पसरली होती.
घटनेची चौकशी करणार
रेल्वेचे कपलिंग दोनवेळा तुटणे ही घटना गंभीर असून, याबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
लगेज उतरवण्यासाठी मदत
या घटनेनंतर प्रवाशांना बॅगा व इतर साहित्य रेल्वेच्या एका डब्यातून दुसऱ्या डब्यात नेण्यासाठी रेल्वेच्या १५ कर्मचाऱ्यांचे पथक मदतीसाठी आले होते.