Experts predictions turned out to be false in Mumbai | तज्ज्ञांचे अंदाज मुंबईत ठरले खोटे

तज्ज्ञांचे अंदाज मुंबईत ठरले खोटे

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तज्ज्ञांच्या टीमने ३१ मेपर्यंत मुंबईत ४४ हजार रुग्ण होतील असा अंदाज वर्तवला होता. मात्र हा अंदाज खोटा ठरला असून मुंबईत ३१ मेपर्यंत फक्त २१ हजार रुग्ण झाले आहेत. त्यातही ७५०० रुग्ण दवाखान्यात अ‍ॅडमिट आहेत. बाकीचे सगळे वेगवेगळ्या ठिकाणी क्वारंटाइनमध्ये आहेत. ही माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल यांनी ‘लोकमत’ला दिली.


चहल यावेळी म्हणाले की, दहा हजार आॅक्सिजनसहितचे बेड तयार करण्यात आले आहेत. त्याशिवाय ३० हजार बेड प्राथमिक अवस्थेतील रुग्णांसाठी वापरले जाणार असून तेही तयार आहेत. देशपातळीवर रुग्णांना डिस्चार्ज देण्याचा दर ४२.८ टक्के असताना मुंबईत रेट ४६ टक्के झाला आहे. मात्र रुग्णांचा मृत्यूदर भारतात ३ असताना मुंबईत मात्र तो ३.२ झाला आहे, ही समाधानाची बाब आहे. रुग्णांचे प्रमाण दुप्पट होण्याचा दरही मुंबईत सुधारला असून आता १६ दिवसांनी रुग्णांचे प्रमाण दुप्पट होत आहे. पूर्वी हे प्रमाण दर अकरा दिवसांवर होते. आयसीएमआरच्या निर्देशांनुसार चाचण्या आणि निश्चित केल्यामुळे रुग्णालयातल्या बेडची संख्या स्थिर राहील, असेही चहल यांनी सांगितले.


मुंबई खासगी हॉस्पिटलमधील ८० टक्के बेड महानगरपालिकेने स्वत:च्या ताब्यात घेतले आहेत. त्यासाठी डॅशबोर्ड तयार केला
आहे. अशा पद्धतीचा डॅशबोर्ड तयार करणारी मुंबई महापालिका देशातली पहिली महानगरपालिका आहे.
या डॅशबोर्डमुळे कोणत्या हॉस्पिटलमध्ये, कोणत्या प्रकारचे, किती बेड रिकामे आहेत आणि
किती बेड रुग्णांनी भरलेले आहेत, याची माहिती मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षात मिळणार आहे. रुग्णांना बेड मिळण्यासाठी अजूनही काही प्रमाणात अडचणी येत
आहेत. त्याविषयीच्या तक्रारी आपल्याकडे येत आहेत. मात्र त्यावर आपण डॅशबोर्डच्या माध्यमातून लवकर मजबूत यंत्रणा उभी करण्याचे काम युद्धपातळीवर करत आहोत, असेही चहल म्हणाले.

‘चेस द व्हायरस’ योजना
आम्ही व्हायरसचा पाठपुरावा करण्याची जी योजना आणली त्याला ‘चेस द व्हायरस’ असे नाव दिले. या माध्यमातून झोपडपट्टी आणि दाट वस्तीच्या भागात ही मोहीम वेगाने राबवली. त्यामुळे त्याची चर्चा देशपातळीवर होत असून अनेक राज्यांनी त्यादृष्टीने काम सुरू केल्याचे ते म्हणाले. मुंबई महापालिका आणि संपूर्ण टीम मिशन मोडमध्ये आहे. येत्या काळात कोरोना व्हायरस मुंबईतून पूर्णपणे हद्दपार झालेला देशाला पाहायला मिळेल, असा आमच्यात ठाम आत्मविश्वासही असल्याचे चहल शेवटी म्हणाले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Experts predictions turned out to be false in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.