Join us  

जयंत ससाणे यांच्या निधनाने सच्चा काँग्रेस कार्यकर्ता हरपला - अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 10:37 AM

श्रीरामपूरचे माजी आमदार व अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जयंत ससाणे यांच्या निधनाने सच्चा काँग्रेस कार्यकर्ता हरपला, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

मुंबई - श्रीरामपूरचे माजी आमदार व अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जयंत ससाणे यांच्या निधनाने सच्चा काँग्रेस कार्यकर्ता हरपला, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. जयंत ससाणे यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, ससाणे आयुष्यभर काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ राहिले. अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. जिल्ह्यात काँग्रेस पक्ष अधिक बळकट व्हावा म्हणून त्यांनी मोलाचे योगदान दिले.

श्रीरामपूर नगरपालिकेचे अध्यक्ष, विधानसभा सदस्य म्हणून श्रीरामपूर आणि परिसराच्या विकासासाठी ते कायम आग्रही राहिले. साईबाबा संस्थान शिर्डीचे अध्यक्ष असताना शिर्डीत मोठ्या प्रमाणात विकास कामे करून साईभक्तांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी केले. जयंत ससाणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ससाणे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. 

शिर्डी संस्थानचे माजी अध्यक्ष जयंत ससाणे यांचे निधन

शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष माजी आमदार जयंत मुरलीधर ससाणे यांचे सोमवारी पहाटे श्रीरामपूर येथे दुःखद निधन झाले. ते 60 वर्षांचे होते.  श्री साईबाबा संस्थानाच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक लोकाभिमुख कामे केली. साई आश्रम भक्त निवास, प्रसादालाय, शहरातील रस्त्यांचे भूसंपादन, विमानतळ उभारणीसाठी निधी ही त्यांची कामे कायम लक्षात राहणारी आहेत. याशिवाय, त्यांनी 10 वर्षे श्रीरामपूरचे आमदारपद आणि 15 वर्षे नगराध्यक्षपद भुषविले. श्रीरामपूर नगरपालिकेला त्यांनी जिल्ह्यात सर्व योजना राबवणारी व सक्षम नगरपालिका अशी ओळख मिळवून दिली होती. श्रीरामपूरची पाणी योजना, रस्ते, दुभाजकाचे सुशोभीकरण, झोपडपट्टी मुक्ती आदी कामाचे श्रेय ससाणे यांना जाते. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण  आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील काही दिवसांपूर्वीच ससाणे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी श्रीरामपूर येथे आले होते.

टॅग्स :जयंत ससाणेकाँग्रेसशिर्डीअशोक चव्हाण