मुंबई - सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिक सहकारी चळवळीशी जोडला जाईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ध्येयाप्रमाणे आपण जगातील तिसऱ्या महासत्ताकडे वाटचाल करीत असून २०४७ मध्ये आपण पूर्ण विकसित राष्ट्र असू, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी केले.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ चा आरंभ केंद्रीय मंत्री शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत गोरेगाव येथे करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार व नागरी विमानचालन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, केंद्रीय सचिव आशिष बुधानी, पंकज बन्सल, तसेच सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ कार्यालयाचे उद्घाटन, नव्याने स्थापन झालेल्या १० हजार बहुउद्देशीय सहकारी संस्थांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम व उद्घाटन तसेच आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ दरम्यानच्या उपक्रमाचे वार्षिक कॅलेंडरचे विमोचन करण्यात आले.
महाराष्ट्र सहकार चळवळीची जननी छत्रपती शिवाजी महाराज यांनी सहकार क्षेत्राची मूळ बीजे रोवली असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र ही सहकार चळवळीची जननी आहे. सहकार हे कोणाची मत्तेदारी नसून सहकार हा देशाचा प्राण आहे.
सहकारातून सकारात्मक बदलसहकार चळवळ अतिशय पारदर्शक आणि स्वच्छ पद्धतीने पुढे जाऊन ग्रामीण भागात आर्थिक सुबत्ता नांदत आहे, सहकार चळवळीशिवाय विकास अशक्य होता, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्र ही सहकाराची पंढरीमहाराष्ट्र ही सहकाराची पंढरी आहे, असे सांगून केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, ग्रामीण भागात रोजगार निर्माण करण्यासाठी सहकार मंत्रालयाची स्थापना करण्यात आली.