वाहनाचे ‘लॉक’ही काम करीत नाही; चोरांमुळे पोलीस, नागरिकांची डोकेदुखी वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 11:08 IST2023-08-07T11:08:44+5:302023-08-07T11:08:55+5:30
गेल्या वर्षभरात वाहन चोरीप्रकरणी ३ हजार २८२ गुह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी अवघ्या दीड हजार वाहनांचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे.

वाहनाचे ‘लॉक’ही काम करीत नाही; चोरांमुळे पोलीस, नागरिकांची डोकेदुखी वाढली
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हॅण्डल लॉक असले तरी, ते तोडून दुचाकींची चोरी होते. हे हॅण्डल लॉक किती सुरक्षित? असा प्रश्न निर्माण होत आहे. मुंबईतून दिवसाला ७ ते ९ वाहने चोरीला जात आहेत. त्यामुळे नागरिकांच्या डोकेदुखी अधिक वाढली आहे.
गेल्या वर्षभरात वाहन चोरीप्रकरणी ३ हजार २८२ गुह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी अवघ्या दीड हजार वाहनांचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे. यावर्षी जानेवारी ते जून दरम्यान १,२८७ वाहने चोरीला गेली आहेत. हॅन्डल लॉक असले तरी चोरटे शिताफीने वाहनांची चोरी करतात.
रस्त्याजवळ उभ्या असलेल्या दुचाकी चोरून काही टोळी त्यांच्या पार्टची मुंबईसह मुंबई बाहेर विक्री करतात. मुंबईतही बऱ्याच गॅरेजमध्ये याची कमी भावात खरेदी करतात. तर काही जण त्यांना भंगारातील दुचाकींचे इंजिन नंबर लावत त्यांची विक्री करतात. भंगारामध्ये निघणाऱ्या दुचाकी दोन ते पाच हजारांमध्ये कागदपत्रांसह ग्राहकांकडून खरेदी करायचे. त्यानंतर त्याच बनावटीची दुचाकी शोधून त्या दुचाकीची चोरी करायचा. अशा टोळ्यांवर मुंबई पोलिसांकड़ून वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे. तर काही ठग बनावट क्रमांक लावून या दुचाकीची सोशल मिडायावरही विक्री करताना दिसून आले आहेत.
मौजमजेसाठी चोरी...
चोरट्यांकड़ून मौजमजेसाठी चोरी केली जात असल्याचे वेळोवेळी चौकशीतून समोर आले आहे. मुंबईत आतापर्यंत दाखल वाहन चोरीच्या घटनांपैकी ६४३ गुह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले आहे. यात आतापर्यंत वेगवेगळ्या टोळ्यांंची, चोरांची पोलिसांकडून धरपकड सुरु आहे.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
रस्त्यावरील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांकड़ून गस्त वाढविण्यात आली आहे. तसेच सर्व आस्थापनाबाहेर सीसीटीव्ही लावण्याचे आदेश पोलिसांकड़ून देण्यात आले आहेत. जेणेकरून गुह्यांची उकल होण्यास मदत होईल. नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले.