सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 09:59 IST2025-09-20T09:59:13+5:302025-09-20T09:59:43+5:30
मनसेसोबत चर्चा सुरू असून युतीचा निर्णय आम्ही घेऊ. हेवेदावे विसरून तयारीला लागा. स्थानिक पातळीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून समन्वय ठेवा.

सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीसाठी उद्धवसेनेने कंबर कसली असून मुंबईपाठोपाठ अंबरनाथ, बदलापूर आणि कल्याण-डोंबिवली पदाधिकाऱ्यांची बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मातोश्री निवासस्थानी घेतली. पक्ष सोडून गेलेले परत आले तरी त्यांना उमेदवारी मिळणार नाही. मात्र, जो पडत्या काळात पक्षासोबत राहिला त्याला शंभर टक्के साथ मिळेल, असे ठाकरे यांनी बैठकीत स्पष्ट केले.
मनसेसोबत चर्चा सुरू असून युतीचा निर्णय आम्ही घेऊ. हेवेदावे विसरून तयारीला लागा. स्थानिक पातळीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून समन्वय ठेवा. आपल्यासोबत जो येईल त्याला शंभर टक्के साथ द्या. मतदानाच्या दिवशी कुठेही दुबार मतदान होणार नाही याकडे लक्ष द्या, असे ठाकरे म्हणाले.
मत्सर म्हणून लढू नका
महिला आघाडी पदाधिकाऱ्यांची बैठक शिवसेना भवन झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी इतर पक्षांपेक्षा आपली महिला आघाडी मजबूत आहे. एका जागेसाठी अनेक अचूक असतात त्यामुळे तिकीट कुणालाही मिळेल तरी प्रत्येकीने मत्सर म्हणून नव्हे तर पक्ष म्हणून लढा, असे सांगितले.
भाजप पदाधिकारी उद्धवसेनेत
विक्रमगड येथील भाजप पदाधिकारी वैभव पडवळे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह मातोश्री येथे उद्धवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी नेते विनायक राऊत, उपनेत्या ज्योती ठाकरे, जिल्हाप्रमुख अनुप पाटील उपस्थित होते.
ठोस जबाबदाऱ्या सोपविल्या
उपविभागप्रमुख, उपविभाग समन्वयक, शाखाप्रमुख, शाखा समन्वयक, शाखासंघटक, शाखा निरीक्षक
यांच्यावर पक्षाने ठोस जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत.