"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 17:37 IST2026-01-10T17:36:41+5:302026-01-10T17:37:06+5:30
भाजपा हा अतिशय सुसंस्कृत पक्ष होता. गिरीश बापट असो, प्रकाश जावडेकर असतील जरी ते आमचे विरोधक असले तरी अतिशय सुसंस्कृत विरोधक होते असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
मुंबई - 'बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी' असं विधान भारतीय जनता पार्टीचे नेते के. अन्नामलाई यांनी मुंबईतील एका प्रचार रॅलीत केले. भाजपा नेत्याच्या या विधानावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. आमचा जीव घेतला तरीही मुंबई महाराष्ट्रापासून तुटू देणार नाही. मुंबई महाराष्ट्राचीच आहे असं सुळे यांनी ठणकावून सांगितले.
अन्नामलाई यांच्या विधानावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अन्नामलाई यांनी केलेले विधान चुकीचे आहे. मुंबई ही महाराष्ट्राची आहे आणि महाराष्ट्राचीच राहणार. कुणीही मुंबईबाबत कटकारस्थान केले तरी आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत मुंबई महाराष्ट्र ठेवण्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली, आमचा जीव जरी घेतला तरी मुंबई महाराष्ट्रापासून बाहेर जाऊ देणार नाही असं त्यांनी म्हटलं.
तसेच भाजपा हा अतिशय सुसंस्कृत पक्ष होता. गिरीश बापट असो, प्रकाश जावडेकर असतील जरी ते आमचे विरोधक असले तरी अतिशय सुसंस्कृत विरोधक होते. याआधी इतक्या खालीपर्यंत भाजपाची पातळी गेली होती. परंतु ज्याप्रकारे नवीन इनकमिंग सुरू केले आहे त्यामुळे दुर्दैवाने भाजपा जो खरेच सुसंस्कृत पक्ष होते, त्यांचे जुने नेते सुसंस्कृतपणे राजकारण करत होते. ते आज कुठे तरी हरवलेत. आज जे नवीन लोक आले आहेत त्यामुळे त्यांच्या पक्षाचे नुकसान झाले आहे आणि महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी खाली जाण्याचं कारण ते आहे असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला.
काय म्हणाले होते भाजपा नेते अन्नामलाई?
देशातील एकमेव असं शहर आहे जिथे ट्रिपल इंजिन सरकार शक्य आहे. केंद्रात मोदी, राज्यात देवेंद्र आणि बीएमसीमध्ये भाजपा महापौर असेल. कारण बॉम्बे महाराष्ट्रातलं शहर नाही तर आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराचे बजेट ७५ हजार कोटी आहे ही लहान रक्कम नाही. चेन्नई बजेट ८ हजार कोटी आहे. बंगळुरू १९ हजार कोटी आहे. त्यामुळे तुम्हाला अशा माणसांची गरज आहे जे आर्थिक नियोजन करून प्रशासन चांगले सांभाळतील असं भाजपा नेते अन्नमलाई यांनी म्हटलं. मात्र मुंबईचा बॉम्बे उल्लेख करत हे महाराष्ट्रातलं शहर नाही असं म्हटल्याने त्यांचे विधान वादात सापडले.