Join us  

'हिटलर सत्तेत आल्यावर त्यानेही मोठं स्टेडियम बनवून स्वत:चचं नाव दिलं होतं'

By महेश गलांडे | Published: February 24, 2021 7:05 PM

या नामांतरावरुन काँग्रेसने मोदी सरकारवर टीका केलीय. गुजरातमधील पाटीदार समाजाचे आणि काँग्रेसचे नेते हार्दीक पटेल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मोटेरा स्टेडियमच्या नावाला विरोध दर्शवला आहे. तसेच, भाजपा सरकारचा हा निर्णय संतापजनक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलय.

ठळक मुद्देस्वातंत्र्य चळवळीतील महान नेते व गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावाने मते मागून थकल्यावर त्यांच्या नावे असलेले गुजरात मधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतले

मुंबई - जगातील सर्वात मोठं स्टेडियम असा लौकिक मिळवणाऱ्या या स्टेडियमचे औपचारिक उदघाटन आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते झाले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, क्रीडामंत्री किरेन रिजिजू आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते. या स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामना आजपासून खेळवण्यात येणार आहे. (India vs England 3rd Test Live Score ) मात्र, स्टेडियमच्या नावावरुन विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही मोदींवर जबरी टीका केलीय. 

अहमदाबादमधील यापूर्वी मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे आता नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) नाव देण्यात आले आहे. त्यामुळे आता मोटेरा स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियम या नावाने ओळखले जाणार आहे. या नामांतरावरुन काँग्रेसने मोदी सरकारवर टीका केलीय. गुजरातमधील पाटीदार समाजाचे आणि काँग्रेसचे नेते हार्दीक पटेल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मोटेरा स्टेडियमच्या नावाला विरोध दर्शवला आहे. तसेच, भाजपा सरकारचा हा निर्णय संतापजनक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलय. तसेच, राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही मोदींना टार्गेट केलंय. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनी टीका करताना, मोदींनी हिटलरसारखी कृती केल्याचं म्हटलंय. 

स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते व गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावाने मते मागून थकल्यावर त्यांच्या नावे असलेले गुजरात मधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतले. हिटलर सत्तेत आल्यानंतर त्यानेदेखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते, असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. तर, मोठ्या सरदारांचं नाव पुसून टाकण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना, छोटे सरदार.. असे ट्विट नवाब मलिक यांनी केलंय. 

नवाब मलिक यांचं ट्विट

हार्दीक पटेल यांचा संताप 

जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमच नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम ठेवण्यात आलंय. हा सरदार पटेल यांचा अपमान नाही का?. सरदार पटेल यांच्या नावाने मत मागणारी भाजपा, आता सरदार साहेबांचा अपमान करत आहे. गुजरातची जनता सरदार पटेल यांचा अपमान सहन करणार नाही, असे म्हणत हार्दीक पटेल यांनी संताप व्यक्त केलाय. 

सज्जनसिंह वर्मा यांनीही केली टीका

सरदार वल्लभाई पटेल यांच्या नावावर मत मागणाऱ्या भाजपाकडून हा सरदार पटेल यांचा अवमान आहे. अहमदाबाद येथील सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलून नरेद्र मोदी स्टेडियम असे ठेवणे म्हणजे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा घोर अपमान आहे, हे लज्जास्पद आहे, असे ट्विट मध्य प्रदेशमधील काँग्रेस नेते आणि देवासचे आमदार  सज्जनसिंह वर्मा यांनी केलंय. वर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाला आक्षेप घेतला आहे. 

स्टेडियमचं वैशिष्ट

हे स्टेडियम सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्हचा भाग आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्‌सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. जगातील सर्वांत मोठ्या स्टेडियममध्ये तब्बल ११ मध्यवर्ती खेळपट्ट्या आहेत. शिवाय जिमसह चार ड्रेसिंग रूम्स आहेत. मोटेरा स्टेडियमच्या पुनर्बांधणीचे काम सध्या बीसीसीआय सचिव असलेले जय शाह हे राज्य संघटनेचे अध्यक्ष असताना सुरू झाले. या स्टेडियममध्ये एक लाख दहा हजार प्रेक्षक सहज बसून सामन्याचा आनंद घेऊ शकतात. 

दरम्यान, मेलबोर्न क्रिकेट स्टेडियमच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. जीसीए स्टेडियममध्ये होणाऱ्या पुढील दोन सामन्यांसाठी जवळपास ५५ हजार तिकिटांची विक्री करण्यात आली आहे. 

टॅग्स :नरेंद्र मोदीनरेंद्र मोदी स्टेडियमजितेंद्र आव्हाडगुजरातअहमदाबादअमित शहानवाब मलिक