‘पूल निरीक्षण प्राधिकरण’ स्थापन करणार; पालिकेचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 06:14 AM2019-03-16T06:14:38+5:302019-03-16T06:14:58+5:30

स्वतंत्र मुख्य पूल निरीक्षकाची नियुक्ती; सर्व पुलांच्या ऑडिटची होणार फेरतपासणी

To establish 'pool inspection authority'; Corporation's decision | ‘पूल निरीक्षण प्राधिकरण’ स्थापन करणार; पालिकेचा निर्णय

‘पूल निरीक्षण प्राधिकरण’ स्थापन करणार; पालिकेचा निर्णय

Next

मुंबई : गेल्या वर्षभरात मुंबईतील पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र स्ट्रक्चरल ऑडिटनंतरही दुरुस्तीच्या कामाला वेग आला नाही. या प्रशासकीय ढिसाळ कारभारामुळे मुंबईकरांचा नाहक बळी जात आहे. मुंबईतील पुलांवरून जाण्याचीही भीती लोकांमध्ये निर्माण झाली आहे. परंतु, पुलांची दुरुस्ती हा विषय आतापर्यंत महापालिकेसाठी गौण ठरला होता. यापुढे मुंबईतील पुलांची दुरुस्ती, देखभालीच्या कामासाठी पूल निरीक्षण प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे. मुख्य पूल निरीक्षक या प्राधिकरणाचे प्रमुख असणार आहेत.

मुंबईतील ३७४ पुलांचे ऑडिट महापालिकेने केले आहे. त्यानुसार पुलांची दुरुस्ती होणार असून, काही पुलांची पुनर्बांधणी होणार होती. पुलांच्या दुरुस्तीसाठी तब्बल ६०० कोटी रुपयांची तरतूद आगामी अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. काही पुलांच्या दुरुस्तीबाबतचा प्रस्तावही स्थायी समितीच्या बैठकीत गेल्या महिन्यात मंजूर करण्यात आला. मात्र, हिमालय पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्व पुलांच्या आॅडिटची फेरतपासणी होणार आहे. यामुळे यापूर्वी दिलेल्या पुलांच्या दुरुस्तीच्या कार्यादेशाबाबतही शंका उपस्थित होत आहे.
आतापर्यंत महापालिकेत पुलांसाठी वेगळा विभाग नव्हता. मात्र या सर्व घटनांनंतर आता पुलासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. कोणत्या पुलाची तपासणी करायची? कशी करायची? त्याचे निकष काय? पुलाची देखभाल करण्यासाठी नियुक्त अभियंत्यांची जबाबदारी निश्चित करणे, अहवाल कोणत्या स्वरूपात असावा? तसेच पूल धोकादायक असल्यास कोणती पावले उचलावीत याबाबतचे सर्व निर्णय घेण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यावर असणार आहे. या प्राधिकरणाच्या स्थापनेचा संपूर्ण आराखडा संचालक (अभियांत्रिकी व प्रकल्प) यांच्यामार्फत एका महिन्यात तयार करण्यात येणार आहे.

प्रशासनाची पळापळ, सत्ताधारी गायब, विरोधक आक्रमक
कामाबाहेर पडलेला मुंबईकर सुरक्षित घरी पोहोचेल, याची शाश्वती राहिलेली नाही. हिमालय पुलाच्या दुर्घटनेने हा धोका दाखवून दिला असून पालिकेचा बेपर्वा कारभारही उजेडात आला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटल्यामुळे विरोधकही आज आक्रमक झाल्याचे दिसून आले. सर्वच या घटनेचा जाब विचारत असल्याने पालिका मुख्यालयातून सत्ताधारी शिवसेना गायब तर प्रशासनाची आज दिवसभर पळापळ सुरू होती. काँक्रिटचा स्लॅब पुलाच्या लोखंडी खांबांना सोडत असतानाही हा पूल चांगल्या स्थितीत असल्याचा अहवाल स्ट्रक्चरल आॅडिटर डी. डी. देसाई असोसिएटेड इंजिनीअरिंग कन्सल्टन्ट यांनी दिला. मात्र पालिका अधिकाऱ्यांनीही पुलाच्या कामांकडे दुुर्लक्ष केल्याचे उजेडात आले आहे. विरोधी पक्ष नेते रवी राजा व राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासन व सत्ताधारीच या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप केला. ऐन निवडणुकीच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे शिवसेना नेते आज दिवसभर मुख्यालयात फिरकले नाहीत. त्यामुळे नेहमी नगरसेवक, नेते, भेटायला येणाºया नागरिकांच्या वर्दळीने गजबजलेल्या पालिका मुख्यालयात आज शुकशुकाट होता. विशेष म्हणजे आयुक्त अजोय मेहता, अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल (प्रकल्प) आणि प्रमुख अभियंता रस्ते संजय दराडे यांनी प्रसिद्धिमाध्यमांना भेट नाकारली. त्यांच्या दालनाबाहेर प्रसिद्धिमाध्यमांना उभे राहण्यासही बंदी घालण्यात आली होती.

‘हिमालय’च्या दुरुस्तीत निष्काळजी
या पुलाची २०१३ मध्ये दुरुस्ती करण्यात आली होती. यामध्ये १.४३ टन स्टील वापरण्यात आले होते. पेंटिंग आणि रेलिंगचे काम अशी डागडुजी करण्यात आली होती. एवढी मोठी दुरुस्ती करताना हा पूल धोकादायक असल्याचे या कामाचे त्या वेळी देखरेख करणाºया अधिकाऱ्यांच्या लक्षात कसे आले नाही? यावर अहवालात आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे. या पुलाच्या स्थितीचा अभ्यास व तपासणी न करताच या पुलाचे काम करण्यात आले होते. कोणतीही काळजी न घेता या पुलाचे काम बेजबाबदारपणे उरकून निष्पाप जीव धोक्यात घातल्याचे कडक ताशेरेही या अहवालातून ओढण्यात आले आहेत.

या महत्त्वाच्या पुलांची दुरुस्ती...
दादर पश्चिम येथील केशवसुत उड्डाणपूल, टी. एच. कटारिया मार्ग, माटुंगा स्टेशन रोड येथील रेल्वेवरील उड्डाणपूल आणि समांतर पादचारी पूल, माहिम रेल्वेवरील पादचारी पूल, पादचारी भुयारी मार्ग, उड्डाणपूल, सेनापती बापट मार्गाला समांतर पादचारी पूल, माटुंगा स्टेशन तसेच चेंबूर, गोवंडी, कुर्ला, घाटकोपर, अंधेरी, विलेपार्ले, वांद्रे अशा ५३ पुलांच्या दुरुस्तीची शिफारस यापूर्वी केलेल्या आॅडिटमध्ये करण्यात आली आहे.

एकूण २९६ ब्रिज, फुटओव्हर ब्रिज आणि रोड ओव्हर ब्रिजपैकी ११० ब्रिज चांगल्या स्थितीत असून कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तर १०७ पुलांची किरकोळ दुरुस्ती तर ६१ पुलांची मोठी दुरुस्ती सुचविण्यात आली होती. यामध्ये १८ पूल तोडून पूर्णपणे नव्याने बांधकाम करण्याच्या सूचना आॅडिटरने केल्या होत्या. त्यानुसार अनेक पुलांची कामे पालिकेकडून सुरू असून काही कामांच्या आॅर्डरही देण्यात आल्या आहेत.
मात्र दुर्घटना घडलेल्या ‘हिमालय’ पुलाला कुठलाच धोका नाही. पुलावरील काँक्रिटला कोणताही धोका नसून कुठेही तडा गेलेला नसल्याने कोणतीही मोठी दुरुस्ती करण्याची आवश्यकता नसल्याचे डी. डी. देसाई या आॅडिटरचे म्हणणे होते.

१८ पुलांची पुनर्बांधणी आवश्यक
मुंबईत २०१० ते २०१३ या काळात मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने सुमारे ३६ स्कायवॉक बांधले आहेत. त्यांच्या देखभालीची जबाबदारी मात्र पालिकेवर आहे. दहिसर येथे स्कायवॉकचा भाग कोसळण्याच्या घटनेनंतर मुंबईतील सर्व स्कायवॉकचे आॅडिट करण्यात आले.
यामध्ये धोकादायक आढळलेल्या स्कायवॉकची दुरुस्ती करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात चेंबूर, वांद्रे, अंधेरी, विलेपार्ले येथील स्कायवॉकची दुरुस्ती केली जाणार आहे.
महापालिकेच्या अखत्यारीतील ३७४ पूल आहेत. यापैकी १८ पूल पाडून त्यांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. यासाठी १३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
मोठी दुरुस्ती आवश्यक असलेले ४७ पूल असून त्यांच्या दुरुस्तीसाठी ६१ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. छोट्या दुरुस्तीची आवश्यकता असलेले १७६ पूल आहेत. त्यांच्या दुरुस्तीवर २०२ कोटी खर्च होणार आहेत.

Web Title: To establish 'pool inspection authority'; Corporation's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.