Join us
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे गटाला धक्का; दोन माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश, एकनाथ शिंदेंनी दिलं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 15:05 IST

यावेळी ठाकरे गटाच्या वसई-नालासोपारा महिला संपर्क प्रमुख भारती गावकर यांनीही शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.

मुंबई: ठाकरे गटाचे घाटकोपर भटवाडी येथील प्रभाग क्रमांक १२८ चे माजी नगरसेवक दीपक हांडे आणि माजी नगरसेविका अश्विनी हांडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदे गटात प्रवेश केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. दोन माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने हा ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे.

यावेळी ठाकरे गटाच्या वसई-नालासोपारा महिला संपर्क प्रमुख भारती गावकर यांनीही शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. त्यासोबतच उपशाखाप्रमुख राजूभाई शिर्सेकर, हसमुख महाराज रावल, रमाकांत झगडे, रोहित बोऱ्हाडे, अमोल गाढवे, राकेश बोढेकर, युवा सेना अधिकारी संतोष मोरे, चंद्रकांत कुंजीर यांनीही पक्षात प्रवेश केला. 

मुंबई स्वच्छ आणि सुंदर व्हावी यासाठी संपूर्ण स्वच्छता अभियान हाती घेतले असून संपूर्ण शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितीतांना सांगितले. तसेच या मोहिमेत मी स्वतः सहभागी होत असून जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. घाटकोपर येथील भटवाडी परिसरातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी निधी कमी पडू दिले जाणार नाही, असे आश्वासन देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेशिवसेना