Join us  

बीडच्या तडफदार सचिन धसची टीम इंडियात एंट्री; आशिया चषकात खेळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 7:53 AM

यंदा अंडर १९ आशिया चषक स्पर्धी दुबईच्या यजमानात खेळवली जाईल.

मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अंडर-१९ आशिया चषकासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. भारताचा १५ सदस्यीय संघ जाहीर झाला असून उदय सहारनला कर्णधार बनवण्यात आले आहे. पंजाबकडून खेळणाऱ्या उदय सहारनकडे संघाची कमान सोपवण्यात आली. विशेष म्हणजे या टीम इंडियात मराठमोळा आणि मराठवाड्यातील बीड जिल्ह्याचा फलंदाज सचिन धसलाही स्थान मिळालं आहे. त्यामुळे, संपूर्ण जिल्ह्यासह राज्यातून त्यांचं कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे. 

यंदा अंडर १९ आशिया चषक स्पर्धी दुबईच्या यजमानात खेळवली जाईल. या स्पर्धेला ८ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे, तर अंतिम सामना रविवारी १७ डिसेंबर रोजी होत आहे. भारतीय संघात मुशीर खानला संधी मिळाली आहे, जो रणजी ट्रॉफी गाजवणाऱ्या सर्फराज खानचा भाऊ आहे. विशेष म्हणजे गतवर्षीच्या अंडर १९ आशिया चषक स्पर्धेचा चॅम्पियन भारतीय संघच आहे. भारताचा अंडर-१९ संघ हा स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. यंदाच्या संघात मराठीजनांसाठी आनंदाची बातमी म्हणजे मराठमोळा बीडचा सुपुत्र सचिन धसचा समावेश संघात झाला आहे. सचिन हा तडफदार फलंदाज आहे. यापूर्वी, कुचबिहार करंडक स्पर्धेसाठी १९ वर्षाखालील महाराष्ट्राच्या संघाचा कर्णधार म्हणूनही सचिनने भूमिका बजावली आहे. 

सचिनचे वडिल बीडमधील आरोग्य विभागात नोकरीत असून आई पोलीस अधिकारी आहे. आई-वडिलांनी लहानपणापासूनच सचिनच्या क्रिकेट करिअरला प्राधान्य दिलं. सचिनची आवड ओळखून अभ्यासापेक्षा त्याच्या क्रिकेट करिअवरच फोकस केला होता.

दरम्यान, या स्पर्धेत भारताने सर्वाधिक आठवेळा किताब जिंकला आहे. मागील पर्वात २०२२ मध्ये निशांत सिंधूच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. टीम इंडियाने एकतर्फी सामना जिंकला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेचा संघ ३८ षटकांत अवघ्या १०६ धावांत सर्वबाद झाला. भारताकडून विकी ओस्तवालने सर्वाधिक ३ बळी घेतले. याशिवाय कौशल तांबेने २ बळी घेतले. तर रवी कुमार आणि राज बावा यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले होते. 

अंडर-१९ आशिया चषक २०२३ साठी भारतीय संघ -

उदय सहारन (कर्णधार), अर्शिन कुलरनी, आदर्श सिंह, रुद्र पटेल, सचिन, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, अरावेल्ली अवनीश राव, सौम्य कुमार, मुर्गन अभिषेक, इनेश महाजन, धनुष गौड, आराध्या शुक्ला, नमम तिवारी, राज लिंबानी.

राखीव खेळाडू - प्रेम देवकर, अंश गोसाई, मोहम्मद अमन. 

टॅग्स :एशिया कप 2023भारतीय क्रिकेट संघबीडधनंजय मुंडे