Join us

दोन तुळशी तलाव भरतील ए‌वढ्या पाण्याचा उपसा; निचरा करण्यासाठी पम्पिंग स्टेशन कार्यान्वित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 13:07 IST

मुंबई महापालिकेचे शर्थीचे प्रयत्न, मुख्य सहा पम्पिंग स्टेशन 'ऑपरेशनल'

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गेल्या चार दिवसांत सर्व पम्पिंग स्टेशनमधून  तब्बल १६,४५१.५५ दशलक्ष लिटर (१,६४५.१५५ कोटी लिटर) एवढ्या पाण्याचा उपसा करण्यात आला. एका अर्थाने ८,०४.६ कोटी लिटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या तुळशी तलावातील पाण्याच्या दुपटीपेक्षा अधिक पाण्याचा उपसा या कालावधीत करण्यात आला.

पाण्याचा निचरा प्रभावीपणे होण्यासाठी  एकूण सहा मुख्य  पम्पिंग स्टेशन कार्यरत आहेत. या केंद्रांमध्ये ४३ पंप असून यापैकी प्रत्येक पंपाची क्षमता प्रति सेकंदाला सहा हजार लिटर पाण्याचा उपसा करण्याची आहे. याचाच अर्थ सर्व पंपांची एकत्रित क्षमता ही प्रत्येक सेकंदाला दोन लाख ५८ हजार लिटर एवढ्या पाण्याचा उपासा करण्याची आहे. उपसा करण्यासाठी सर्व सहा उदंचन केंद्रामध्ये कार्यरत असलेले पंप चार दिवसांच्या कालावधीदरम्यान सर्व पंपांचा एकत्रितरित्या विचार केल्यास ७६१ तास व ३८ मिनिटे कार्यरत होते, असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

सहा तासांत १८२.५ कोटी लिटर पाण्याचा उपसा

पाणी उपसण्यासाठी महापालिकेने ५४० उदंचन पंप बसवले  आहेत. मंगळवारी ६ तासांत या ५४० उदंचन पंपांद्वारे १८२.५ कोटी लिटर पाण्याचा उपसा करण्यात आला आहे.

पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी क्षमता वाढविणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला परिस्थितीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईच्या वाढत्या लोकसंख्या आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या यंत्रणांची क्षमता आदी बाबी हे लक्षात घेता या क्षमतेत वाढ करणे आवश्यक असून त्या दृष्टीने मुंबई महापालिका प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणांचा आढावा घेण्यासाठी त्यांनी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षास भेट दिली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर माहिती दिली.

आपत्कालीन कक्षात येण्यापूर्वी शिंदे यांनी मिठी नदी परिसराला भेट दिली. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे क्रांतीनगरातील सुमारे ३५० लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे, असे त्यांनी सांगितले. तिथे त्यांची राहण्याची, जेवणाची तसेच वैद्यकीय सुविधेची व्यवस्था केली आहे. या परिसरात एनडीआरएफची टीमही तैनात केली आहे, असेही ते म्हणाले.

पाण्याचा उपसा करणारे ५२५ पंप

मुंबईत पाण्याचा उपसा करणारे ५२५ पंप, सहा मुख्य पंपिंग स्टेशन तसेच दहा लहान पम्पिंग स्टेशन पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. मिठी नदीच्या रुंदीकरणाचे आणि खोलीकरणाचे प्रकल्प आपण हाती घेतले आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियाही सुरू झाली आहे. हा प्रकल्प मार्गी लागल्यानंतर मिठी नदीचा प्रश्न सुटेल, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

पुनर्वसन करण्याचा आमचा प्रयत्न

दरड कोसळणाऱ्या ठिकाणी त्या भागात ‘जिओनेटिंग’ करण्याची कामे सुरू आहेत. आज घाटकोपर पार्कसाइट या भागाला भेट दिली. तिथेही ‘जिओनेटिंग’ची कामे सुरू केली जाणार आहेत. दरडी कोसळण्याचे प्रकार वारंवार घडतात. त्यामुळे जीवितहानी होते. या घटना  टाळण्यासाठी डोंगराळ व त्यातील लोकांचे एसआरए आणि म्हाडाच्या माध्यमातून कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईचा पाऊसपाऊस