आणखी तीन तलावांमध्ये मनमुराद पोहण्याचा आनंद; प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी गरजेची

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 11:18 AM2024-02-21T11:18:05+5:302024-02-21T11:19:14+5:30

मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. तीन नवे जलतरण तलाव त्यांच्यासाठी खुले होत आहेत.

enjoy indulgent swimming in three more pools online registration is required for admission | आणखी तीन तलावांमध्ये मनमुराद पोहण्याचा आनंद; प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी गरजेची

आणखी तीन तलावांमध्ये मनमुराद पोहण्याचा आनंद; प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी गरजेची

मुंबई : मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. तीन नवे जलतरण तलाव त्यांच्यासाठी खुले होत आहेत. या तलावांची कामे जवळपास संपली असून, येत्या १० ते १५ दिवसांत या तलावात पोहण्याचा आनंद घेता येईल. विक्रोळी टागोरनगर, अंधेरी कोंडीविटा परिसर आणि वरळी टेकडी जलाशय या ठिकाणी हे तलाव आहेत. त्याशिवाय अन्य काही तलावांच्या दुरुस्तीची कामेही सुरू आहेत.

महापालिकेच्या वतीने गेल्या वर्षी मार्च महिन्यात अंधेरी पश्चिम येथील गिल्बर्ट हिल येथील जलतरण तलावाचे उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर वरील तीन तलावांचे लोकार्पण होणार आहे. या तिन्ही तलावांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तिन्ही तलावांची एकूण मिळून सदस्य संख्या २७५० एवढी आहे, तर, आकार २५ बाय १५ चौरस मीटर एवढा आहे. या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.

पाण्यामुळे विकार :

दहिसर पश्चिमेकडील तलाव ३१ जानेवारी २०२४ पासून दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आला आहे. हा तलाव सुरू झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच टाइल्स निखळण्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे तलाव दुरुस्तीसाठी बंद ठेवण्याची नामुष्की आली आहे. दादर येथील तलावातील पाण्याच्या दर्जाविषयी प्रश्न उपस्थित झाल्याने मागील महिन्यात तेथील पंप बदलण्याचे काम हाती घेण्यात आले होते. तलावातील पाण्यामुळे त्वचेचे विकार होत असल्याच्या तक्रारी सभासदांनी केल्या होत्या.

‘तो’ तलाव बारगळल्यात जमा :

१) घाटकोपर ओडियन सिनेमाजवळील तलावही बंद होता. याठिकाणी आता नवा तलाव बांधण्यात आला असून, तो ऑलिम्पिक दर्जाचा आहे. पाचव्या वाजल्यावर हा तलाव बांधला आहे. 

२) विक्रोळी पूर्व कन्नमवारनगर येथे अनेक वर्षांपूर्वी जलतरण तलाव बांधण्यासाठी म्हाडाचा भूखंड आरक्षित करण्यात आला होता. दोनवेळा भूमिपूजन होऊनही या तलावाचे काम मार्गी लागले नाही. 

३) आता या भागातील तलाव बारगळल्यात जमा आहे. विक्रोळी टागोरनगर भागात नवा तलाव सुरू होत असल्याने एकाच विभागात दोन तलाव सुरू करणे अशक्य दिसते.

Web Title: enjoy indulgent swimming in three more pools online registration is required for admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.