CET: सीईटी कॅपच्या यंदापासून चार फेऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 08:55 IST2025-06-21T08:55:26+5:302025-06-21T08:55:26+5:30

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश फेऱ्यांच्या यंदा चार फेऱ्या होणार आहेत.

Engineering admission process revision: Four CAP rounds instead of three, stricter admission confirmation rule | CET: सीईटी कॅपच्या यंदापासून चार फेऱ्या

CET: सीईटी कॅपच्या यंदापासून चार फेऱ्या

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश फेऱ्यांच्या यंदा चार फेऱ्या होणार आहेत. राज्य सरकारने यंदापासून इंजिनिअरिंगसह तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारितील प्रवेशप्रक्रियेसाठी ही अधिसूचना जारी केली आहे. 

केंद्रीभूत प्रवेशाच्या यापूर्वी तीनच फेऱ्या होत असल्याने विद्यार्थ्यांना खासगी कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी व्यवस्थापन कोट्याचा आधार घ्यावा लागत होता. तिसऱ्या फेरीनंतर संस्थात्मक स्तरावर प्रवेश घ्यावा लागत असे. कॉलेज नियमित शुल्काच्या दोन ते तीन पट शुल्क मागत असल्याचे प्रकार समोर आले होते. त्यामुळे प्रवेशाच्या अधिक संधीसाठी केंद्रीभूत प्रवेश फेऱ्यांच्या चार फेऱ्या घेतल्या जाणार आहेत. 

...तर प्रवेश बंधनकारक
- पहिल्या फेरीत विद्यार्थ्याने नमूद केलेल्या पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज. 
- विद्यार्थ्याने दुसऱ्या फेरीसाठी नमूद केलेल्या पहिल्या तीन पसंतीक्रमाचे कॉलेज प्रवेश मिळाल्यास.
- विद्यार्थ्याने तिसऱ्या फेरीसाठी नमूद केलेल्या पहिल्या सहा पसंतीक्रमाच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यास.

चौथ्या फेरीनंतरच प्रवेश 
विद्यार्थ्याने पहिल्या फेरीतील पहिले कॉलेज, दुसऱ्या फेरीतील पहिले तीन कॉलेज, तिसऱ्या फेरीतील पहिले सहा आणि चौथ्या फेरीतील सर्व कॉलेजांमध्ये प्रवेश मिळूनही प्रवेश न घेतल्यास त्याला त्यापुढील फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही. त्यामुळे त्याला थेट संस्थात्मक स्तरावर चौथ्या फेरीनंतरच प्रवेश घ्यावा लागेल.

अर्जांचा विचार होणार 
यापूर्वी संस्थात्मक स्तरावरील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना कॉलेजांकडे अर्ज करावा लागे. मात्र, अनेकदा कॉलेजांकडून विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येत असे. या पार्श्वभूमीवर आता विद्यार्थ्यांना सीईटीच्या संकेतस्थळाद्वारे संस्थात्मक स्तरावरील प्रवेशासाठी अर्ज करता येईल. सीईटी सेलकडून हे अर्ज संस्थांना पाठविण्यात येतील. संस्थांना गुणवत्तायादी तयार करताना अर्जांचा विचार करावा लागेल.

Web Title: Engineering admission process revision: Four CAP rounds instead of three, stricter admission confirmation rule