महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना आता एनर्जी बार; आठवड्यातून तीनदा वाटप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 11:53 IST2025-12-18T11:53:13+5:302025-12-18T11:53:53+5:30
बालवाडीच्या मुलांना प्रथमच पोषण आहार

महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना आता एनर्जी बार; आठवड्यातून तीनदा वाटप
मुंबई: महापालिकेच्या बालवाडी ते दहावीपर्यतच्या साडेतीन लाख विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासोबत पोषण आहार म्हणून तीन दिवस एनर्जी बार दिला जाणार आहे. याबाबतचा निर्णय शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांनी २५ नोव्हेंबरला घेतला आहे.
प्रति एनर्जी बारची किंमत ३५ रुपये असून, चालू आणि पुढील वर्षे त्याच्या खरेदीसाठी १९६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, बालवाडीच्या मुलांना प्रथमच पोषण आहार मिळणार आहे.
सुदृढ आरोग्यासाठी सकास आहाराबरोबरच विद्यार्थ्यांना हा एनर्जी बार देण्यात येणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला आठवड्यातून एक दिवसआड, असे आठवड्यातील तीन दिवस, प्रत्येकी २५ ग्रॅमचे एनर्जी बार देण्यात येणार आहेत. पालिकेने या बारच्या पुरवठ्यासाठी गुणिणा कमर्शिअल्स प्रा. लि. या कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे.
एनर्जी बारचे वितरण केवळ विद्यार्थ्यांना होईल, याची दक्षता मुख्याध्यापक किंवा प्रमुख शिक्षकांनी द्यावी. एनर्जी बार सुस्थितीत, हवाबंद पॅकेटमध्ये आहेत का याची तपासणी करूनच वितरण करावे. विद्यार्थ्यांनी एनर्जी बार खाल्ल्यानंतर शाळांनी पाकिटाची योग्य विल्हेवाट लावावी. कोणतीही तक्रार असल्यास ती त्वरित लेखी स्वरूपात प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळवावी, असे शिक्षण विभागाने निर्णयात म्हटले आहे.
मध्यान्ह भोजनातील आहार
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात दोन दिवस कडधान्याची आमटी व भात, दोन दिवस वरणभात तर दोन दिवस डाळ-तांदळाची खिचडी दिली जाते.
पोषक द्रव्ये, कॅलरीज
एनर्जी बारमुळे विद्यार्थ्यांना आवश्यक कॅलरीज, पोषकद्रव्ये मिळतील, त्यांच्या शरीरातील ऊर्जा टिकून राहील.
"आम्ही सातत्याने बालवाडीच्या बालकांना पोषण आहार देण्याची मागणी करत होतो. आता नियमित त्याचे वितरण व्हायला हवे."
- रमेश जाधव, अध्यक्ष, श्रमिक भारतीय युनियन बालवाडी शिक्षिका संघटना