Video : शेवटी तो बापच... मुलीची पाठवणी करताना संजय राऊत गहिवरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 15:02 IST2021-11-30T09:14:29+5:302021-11-30T15:02:58+5:30
या लग्नातील काही व्हिडीओ आणि फोटो सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत असतानाच राऊत यांच्यातील बापमाणसाचे दर्शन घडविणारे फोटो अन् व्हिडिओही समोर आले आहेत.

Video : शेवटी तो बापच... मुलीची पाठवणी करताना संजय राऊत गहिवरले
मुंबई - आई-वडिलांच्या आयुष्यात अत्यानंद देणारा क्षण असतो तो म्हणजे आपल्या लेकराचं लग्न. मुलगा असो वा मुलगी, वरमाय अन् वरबाप किंवा वधुमाय अन् वधुपिता यांचा थाट वेगळाच असतो. विशेषत: पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या समाजात वधुपित्याची विनम्रता मुलीच्या लग्नात दिसून येते. मग, तो कितीही मोठा बाप असला तरी कन्यादानाच्या सोहळ्यात बापमाणूसच दिसून येतो. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील हळवा अन् बापमाणूसही महाराष्ट्राने पाहिला. मुलीची पाठवणी करताना संजय राऊत हेही भावूक झाल्याचे दिसून आले.
राऊत आणि नार्वेकर कुटुंबातील लग्नसोहळा गेल्या 2 दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. या लग्नातील काही व्हिडीओ आणि फोटो सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत असतानाच राऊत यांच्यातील बापमाणसाचे दर्शन घडविणारे फोटो अन् व्हिडिओही समोर आले आहेत. मुलगी पूर्वशी हिच्या लग्नसोहळ्यात खासदार सुप्रिया सुळेंसमेवत आनंदाने डान्स करणारा बाप दुसऱ्याच दिवशी मुलीची पाठवणी करताना भावूक झाल्याचे दिसून आले. पूर्वशीच्या मातोश्रींच्या डोळ्यातील पाणी पाहून संजय राऊत यांचाही कंट दाटला होता. त्यावेळी, मुलीच्या पाठीवर हात ठेवत संजय राऊत यांनी स्वत:च्या डोळ्यातील अश्रू लपवले. मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणातील वाघ पक्षाचा आक्रमक नेताही भावूक झाल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं.
राजकारणात गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपल्या आक्रमक आणि रोखठोक शैलीने परिचीत असलेले संजय राऊत मुलीच्या लग्नात वेगळचे दिसले. कधी नाचले, कधी लगीनघाईमुळे व्यस्त दिसले, कधी पाहुण्यांच्या स्वागत रमले तर मुलीची पाठवणी करताना डोळ्यात अश्रू साठवून मनातून रडले. शेवटी राजकारणीही बापमाणूसच असते, हे सर्वांनीच पाहिले.