मंत्रालयात झिंग झिंग झिंगाट; दारूच्या बाटल्या सापडल्याने एकच खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 08:06 IST2021-08-11T08:05:29+5:302021-08-11T08:06:46+5:30
सामान्य प्रशासन विभागाने दिले प्रकरणाच्या चौकशीचे आदेश

मंत्रालयात झिंग झिंग झिंगाट; दारूच्या बाटल्या सापडल्याने एकच खळबळ
मुंबई : राज्याची सत्ता आणि प्रशासनाचे मुख्य केंद्र असलेल्या मंत्रालयातच दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.
नवीन मंत्रालय इमारतीत उपाहारगृहाच्या बाजूला तळमजल्याच्या आसपास अडगळीत दारूच्या बाटल्या असल्याचे निदर्शनास आल्यावर तात्काळ त्या बाटल्या हटवण्यासाठी मंत्रालय प्रशासनाच्या वतीने पाऊले उचलली गेली. मंत्रालयात दारूच्या बाटल्या आल्या तरी कशा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मंत्रालयाच्या तिन्ही प्रवेशद्वारांवर कडक सुरक्षा व्यवस्था असते. प्रत्येक वस्तूची तपासणी केली जाते. दारूच्या बाटल्या आणल्या जात असताना पद्धतशीरपणे डोळेझाक करण्यात आली. रिकाम्या बाटल्या पडलेल्या ठिकाणापासून दोन फुटांवर सीसीटीव्ही कॅमेरा आहे. आता ही दारू रिचवणारे तळीराम कोण याचा शोध घेण्यात येणार आहे. त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेण्यात येणार आहे.
दरेकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळत आहे. ही महाराष्ट्रातील परंपरेला काळिमा फासणारी घटना असून या दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्याच कशा? याची चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
तसेच या गंभीर प्रकरणाची अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन १५ दिवसांच्या आत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
मंत्रालयाची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था गृह विभागाच्या अखत्यारीत येते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सामान्य प्रशासन विभाग यांच्यावर शेकवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. जबाबदारी झटकण्याचे प्रकार सुरू असल्याची चर्चा होती.
या बाटल्या येथे कशा आल्या? तसेच यामध्ये दोषी कोण याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दोषी आढळलेल्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.
- दत्तात्रय भरणे,
राज्यमंत्री, सामान्य प्रशासन