शैक्षणिक संस्थांच्या विश्वस्त निधीतून बेनामी मालमत्तांचे साम्राज्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 07:25 AM2022-03-25T07:25:23+5:302022-03-25T07:25:37+5:30

मुंबईसह राज्यातील प्राप्तिकर विभागाच्या छापेमारीत उघड

Empire of Anonymous Assets from the Trust Fund of Educational Institutions | शैक्षणिक संस्थांच्या विश्वस्त निधीतून बेनामी मालमत्तांचे साम्राज्य

शैक्षणिक संस्थांच्या विश्वस्त निधीतून बेनामी मालमत्तांचे साम्राज्य

googlenewsNext

मुंबई :  शैक्षणिक संस्थांच्या विश्वस्त निधीतून बेनामी मालमत्तांचे साम्राज्य उभे केल्याची माहिती प्राप्तिकर विभागाने मुंबई, महाराष्ट्र, तमिळनाडूमध्ये केलेल्या २५ ठिकाणांच्या छापेमारीतून उघडकीस आले आहे. या सर्च ऑपरेशनमधून २७ लाख रुपयांच्या रोकडीसहीत ३ कोटी ९० लाख रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहे. 

प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात आणि परदेशात विविध ठिकाणी शाळा तसेच महाविद्यालये चालविणाऱ्या प्रसिद्ध शैक्षणिक संस्थेच्या साखळीवर प्राप्तिकर विभागाने १४ मार्च रोजी छापेमारी करीत कारवाई केली.  महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये स्थापन केलेल्या २५ शैक्षणिक संस्थांच्या संकुलांमध्ये हे सर्च ऑपरेशन राबवण्यात आले.  

या मोहिमेदरम्यान, आक्षेपार्ह दस्तऐवज आणि डिजिटल स्वरूपातील माहिती सापडली असून ती ताब्यात घेण्यात आली आहे. यातून, या शैक्षणिक संस्थेचे अनेक प्रवर्तक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या व्यक्तिगत फायद्यासाठी संस्थेच्या विश्वस्त निधीमधून मोठ्या प्रमाणावर पैसे काढण्यात आल्याचे दिसून येत आहे. या व्यवहारामुळे प्राप्तिकर कायदा १९६१अंतर्गत विश्वस्त संस्थेला मिळणाऱ्या सवलती देऊ करणाऱ्या तरतुदींचा भंग झाल्याचे दिसून येत आहे.  
विश्वस्त निधीतून मोठ्या प्रमाणात पैसे काढण्यासाठी वापरण्यात आलेल्या विविध पद्धती समोर आल्या. यामध्ये,  संस्थेचे अनेक प्रवर्तक तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या तसेच त्यांच्या विश्वासातील कर्मचाऱ्यांच्या विविध बनावट कंपन्या आणि एलएलपीमधून वस्तू आणि सेवांच्या शुल्काच्या नावाखाली ट्रस्टमधून पैसे काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.  

या व्यवहारांमध्ये या संस्थांनी प्रत्यक्षात कोणत्याही वस्तू किंवा सेवा दिलेल्या नाहीत आणि संस्थेच्या कर्मचाऱ्यांनीदेखील याला दुजोरा दिला असल्याचे प्राप्तिकर विभागाने नमूद केले. 

डझनभर स्थावर मालमत्ता  
या सर्च ऑपरेशनमध्ये महाराष्ट्र, पुदुचेरी आणि तमिळनाडूमधील सुमारे दोन डझन स्थावर मालमत्तांविषयी पुरावे प्राप्तिकर विभागाच्या हाती लागले आहेत. 
या मालमत्ता बेनामी किंवा संबंधित लोकांच्या आयकर विवरणात जाहीर केलेल्या नाहीत. या सर्व मालमत्तांवर तात्पुरती टाच आणण्यात आली असल्याचेही प्राप्तिकर विभागाने नमूद केले. 

५५ कोटीचे कर्ज हुंडीस्वरूपात 
या कारवाईदरम्यान, सुमारे ५५ कोटी रुपयांच्या हुंडी स्वरूपात कर्ज घेतल्याचे आणि त्याची रोखीने परतफेड केल्याचे यावेळी सापडलेल्या प्रॉमिसरी नोट, विनिमय पावत्यांमधून समोर आले. 
हे सर्व साहित्य जप्त केले आहे. यामध्ये  २७ लाख रुपये रोख आणि  ३ कोटी ९० लाख रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहे.

Web Title: Empire of Anonymous Assets from the Trust Fund of Educational Institutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.