आपत्कालीन क्षण, जीवन-मरणाचा प्रश्न! अडीच कोटी मुंबईकरांसाठी चिंता वाढवणारी बातमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 11:15 IST2026-02-14T11:15:20+5:302026-02-14T11:15:57+5:30
५३ रक्तपेढ्यांची होते परीक्षा, मुंबईतील २.५ कोटींच्या लोकसंख्येच्या तुलनेत रक्त पुरवठ्याचे आता मोठे आव्हान

आपत्कालीन क्षण, जीवन-मरणाचा प्रश्न! अडीच कोटी मुंबईकरांसाठी चिंता वाढवणारी बातमी
मुंबई - अपघात, प्रसूतीमधील अचानक रक्तस्राव, कर्करोग उपचार किंवा मोठी शस्त्रक्रिया, अशा आपत्कालीन क्षणी प्रत्येक सेकंद महत्त्वाचा ठरतो. त्यावेळी एका रक्त पिशवीवर रुग्णाचे जीवन अवलंबून असते. मात्र, मुंबईतील वाढत्या लोकसंख्येसाठी असलेल्या केवळ ५३ रक्तपेढ्या अपुऱ्या ठरत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
सुमारे अडीच कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबईत सध्या ५३ रक्तपेढ्यांद्वारे रक्तपुरवठा केला जात आहे. मात्र, वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर ही व्यवस्था किती सक्षम आहे, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईत विविध संस्था व संघटनांकडून वर्षभर रक्तदान शिबिरे घेतली जातात. मात्र, औषध व अन्न प्रशासनाच्या नियमांनुसार रक्तपेढ्यांचे कार्यक्षेत्रानुसार वर्गीकरण करण्यात आले आहे. यात पूर्ण परवानाधारक रक्तसंकलन व प्रक्रिया केंद्र, रक्तपेढीकडून रक्त व घटक मागवून साठवण करणाऱ्या आणि रुग्णांना रक्त देण्याची सुविधा पुरविणाऱ्या अशा रक्तपेढ्यांचा समावेश आहे.
रक्तपेढ्यांमधील उपलब्ध
प्रमुख प्रकार असे आहेत...
पॅक्ड रेड ब्लड सेल्स : रक्तातील लाल पेशी वाढवून शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्यास मदत करते.
प्लेटलेट्स : रक्तस्राव थांबवून रक्त गोठवण्यासाठी आवश्यक.
फ्रेश फ्रोजन प्लाझ्मा : यात रक्त गोठवण्याचे घटक असतात.
क्रायोप्रेसिपिटेट : रक्त गोठवण्याचे आवश्यक असे विशेष घटक यात असतात.
संपूर्ण रक्त : मोठा अपघात आणि तातडीचा रक्तस्राव अशा अत्यंत आपत्कालीन परिस्थितीत संपूर्ण रक्त दिले जाते.
रक्तदान शिबिरांतील रक्त जाते कुठे?
रक्तपेढीला रक्तसंकलन, तपासणी, रक्तघटक विभाजन व साठवण करण्याची परवानगी आहे. विविध संस्था व संघटनांकडून आयोजित रक्तदान शिबिरांतील रक्त याच केंद्रांमार्फत संकलित केले जाते. तपासणीनंतर ते रक्त प्लेटलेट्स, प्लाझ्मा आणि रेड सेल्स, असे घटक वेगळे करून साठविण्यात येते. साठवण करणाऱ्या रक्तपेढ्यांना रक्तासाठी परवानाधारक रक्तपेढ्यांवर अवलंबून राहावे लागते. अपघातातील ‘गोल्डन अवर’मध्ये तातडीने रक्त उपलब्ध होणे महत्त्वाचे असते. अशावेळी शुल्क भरून रक्त देण्याची सुविधा पुरविणाऱ्या रक्तपेढीकडून रुग्णांना रक्त पुरविण्यात येत आहे.
नियमित रक्तदान हीच प्रभावी उपाययोजना
एका रक्त पिशवीवर रुग्णाचे जीवन अवलंबून असल्याने वेळेत रक्त उपलब्ध होणे हीच खरी कसोटी आहे. नियमित व स्वेच्छेने रक्तदान करणे हीच रक्त तुटवड्यावर प्रभावी उपाययोजना आहे.