एलफिन्स्टन ब्रिज चेंगराचेंगरी : दु:ख, आवेग आणि संतापाने शहारले केईएम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 14:30 IST2017-09-29T14:23:40+5:302017-09-29T14:30:10+5:30
परळ स्थानकाच्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे 22 लोकांना प्राण गमवावे लागले. या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या लोकांना केईम रुग्णालयात आणण्यात आले.

एलफिन्स्टन ब्रिज चेंगराचेंगरी : दु:ख, आवेग आणि संतापाने शहारले केईएम
मुंबई - परळ स्थानकाच्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे 22 लोकांना प्राण गमवावे लागले. या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या लोकांना केईम रुग्णालयात आणण्यात आले. वाडिया रुग्णालयापासून केईएमपर्यंतचा रस्ता इतर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
जखमींचे नातेवाईक , मदतीसाठी धावून आलेल्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते व माध्यमांचे प्रतिनिधी यांच्या गर्दीने केइएमचे आवार भरुन गेले होते. शिक्षणमंत्री विनोद तावडे, आरोग्यमंत्री दीपक सावंत, दीवाकर रावते या मंत्र्यांसह विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केईएमला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबई महापौर विश्वनाथ महाडेश्वर, भाजपा प्रवक्त्या शायना एन . सी, मनसे नेते नितिन सरदेसाई यांनीही भेट दिली.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये तसेच जखमींवर मोफत उपचार करण्याचे जाहीर केले. ही घटना घडलीच कशी याबाबत राजकीय नेत्यांना विचारले असता त्यावर आता बोलणे उचित ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया बहुतेक नेतेमंडळीनी यावेळी दिली. केईममध्ये राजकीय कार्यकर्त्यांना रक्तदानाचे आवाहन आणि जमलेल्या नागरिकांना शिस्तीचे आवाहन ध्वनीक्षेपकावरुन करण्यात येत होते. परळ आणि एलफिन्स्टन स्थानकात होणा-या नेहमीच्या गर्दीमुळे आणि त्यांना होणा-या त्रासाबद्द्ल उपस्थित नागरिक संताप व्यक्त करत होते.