Elgar Morcha : भारिपच्या एल्गार मोर्चामुळे दक्षिण मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 09:06 IST2018-03-26T08:33:38+5:302018-03-26T09:06:47+5:30
कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी भारिप-बहुजन महासंघानं एल्गार मोर्चाचं आयोजन केले आहे. या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईत वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

Elgar Morcha : भारिपच्या एल्गार मोर्चामुळे दक्षिण मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी
मुंबई - कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी भारिप-बहुजन महासंघानं एल्गार मोर्चाचं आयोजन केले आहे. आंदोलनासाठी आझाद मैदानात भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे. आंदोलनकर्त्यांमुळे दक्षिण मुंबईमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण झाल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
जिजामाता उद्यान ते विधान भवन दरम्यान मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी ऐन वेळी मोर्चाला परवानगी नाकारली. या पार्श्वभूमीवर, ''जिजामाता उद्यानातून मोर्चाला सुरुवात करायचे आमचे नियोजन होते. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारून ते विस्कटवले. आता आम्ही थेट सीएसएमटीला जमणार आणि तिथेच काय तो निर्णय घेणार. आता नियंत्रण करणे आमच्या हातात नाही. सोमवारी जे काही होईल, त्याला राज्य सरकार जबाबदार असेल'', असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला.
...म्हणून पोलिसांनी नाकारली परवानगी
ICSE, CBSE, ISC च्या बोर्ड परीक्षा सुरू आहेत, त्यामुळे भारिपाच्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांना फटका बसू शकतो, असे सांगत राज्य सरकारनं एल्गार मोर्चाला परवानगी नाकारली. मात्र, एल्गार मोर्चासाठी महाराष्ट्रातून नागरिक मुंबईकडे रवाना झाले आहेत. ते आता परत जाऊ शकत नाहीत. त्यामुळे सोमवारचा एल्गार मोर्चा निघणारच, अशी भूमिका भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी (25 मार्च) मांडली.
मुंबई पोलिसांचे प्रवक्ते, डीसीपी दीपक देवराज यांनी सांगितले की, भारिपा बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांना आझाद मैदानात आंदोलन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा व प्रवाशांना होणारा अडथळा लक्षात घेऊन एल्गार मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती.