अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया : तिसऱ्या यादीसाठी ९९ हजार ७३५ जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 00:54 IST2018-07-28T00:54:09+5:302018-07-28T00:54:35+5:30
अल्पसंख्याक कोट्यातील जागा रिक्त राहण्याची भीती

अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया : तिसऱ्या यादीसाठी ९९ हजार ७३५ जागा
मुंबई : अल्पसंख्याक महाविद्यालयातील इनहाउस कोट्यातील जागा केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट कराव्यात, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिल्यानंतर शुक्रवारी महाविद्यालयांतील एकूण रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात आली. २६ जुलैपर्यंत इनहाउस कोट्यातील एकूण ६८०२ जागा सरेंडर करण्यात आल्या होत्या. त्यामुळे महाविद्यालयातील रिक्त जागांच्या एकूण संख्येत आता वाढ झाली असून महाविद्यालयांतील ९९ हजार ७३५ जागा उपलब्ध झाल्या आहेत. येत्या दोन दिवसांत विद्यार्थ्यांनी रिक्त जागांनुसार तिसºया गुणवत्ता यादीसाठी आपल्या अर्जात बदल करून घ्यायचे आहेत.
महाविद्यालयांकडून कोट्याच्या एकूण रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शहरातील महाविद्यालयांत अद्याप इनहाउसच्या एकूण १२ हजार ९११ जागा उपलब्ध आहेत. तर व्यवस्थापन कोट्याच्या ११ हजार ८१२ आणि अल्पसंख्याक कोट्याच्या ५८ हजार २८३ जागा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. म्हणजेच प्रवेश प्रक्रियेसाठी आता एकूण ९९ हजार ७३५ जागा उपलब्ध आहेत. यातील ८३ हजार ६ जागा कोट्याच्या असतील.
अल्पसंख्याक कोट्यातील जागा या फक्त अल्पसंख्याक विद्यार्थ्यांपुरत्याच मर्यादित राहतील आणि महाविद्यालयीन स्तरावर भरल्या जातील, असे आदेश नागपूर खंडपीठाने दिले आहेत. मात्र या निर्णयामुळे बºयाचशा अल्पसंख्याक महाविद्यालयांत या कोट्यातील जागा प्रवेश प्रक्रियेत रिक्त राहणार असल्याची भीती आहे.
कोट्यातील जागांचा गोंधळ
कोट्यातील जागांच्या गोंधळामुळे अकरावीची तिसरी गुणवत्ता यादी पुढे ढकलण्यात आली असून प्रवेश प्रक्रियेचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शहरातील महाविद्यालयांत अद्याप इनहाउसच्या १२ हजार ९११ जागा, व्यवस्थापन कोट्याच्या ११ हजार ८१२ आणि अल्पसंख्याक कोट्याच्या ५८ हजार २८३ जागा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.