कांदिवली स्थानकात 'एलिव्हेटेड डेक' सेवेत; प्रवाशांच्या सुविधेसाठी सहा नव्या जिन्यांची उभारणी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 17:46 IST2025-11-17T17:45:18+5:302025-11-17T17:46:14+5:30
Kandivali station: पश्चिम रेल्वेच्या कांदिवली स्टेशनमध्ये १३२ मीटर लांबीचा आणि १०.४० मीटर रुंदीचा एलिव्हेटेड डेक प्रवाशांसाठी खुला करण्यात आला.

कांदिवली स्थानकात 'एलिव्हेटेड डेक' सेवेत; प्रवाशांच्या सुविधेसाठी सहा नव्या जिन्यांची उभारणी!
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या कांदिवली स्टेशनमध्ये १३२ मीटर लांबीचा आणि १०.४० मीटर रुंदीचा एलिव्हेटेड डेक प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. हा डेक प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर असून, या डेकमुळे गर्दीचे व्यवस्थापन करण्यास मदत मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) मार्फत कांदिवली स्टेशनवर सुधारणा प्रकल्प राबविण्यात येत आहे. 'मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्प-३ अ' (एमयूटीपी) अंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात येत असून, प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देऊन कामे वेगाने सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांत प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक कामे पूर्ण करण्यात आली. दक्षिणेकडील टोकावर १० मीटर रुंद पादचारी पूल सुरू केला असून एलिव्हेटेड डेक खुला झाल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
सर्व प्लॅटफॉर्मना जोडणी
प्लॅटफॉर्म ४ च्या दक्षिण टोकावर ४ मीटर रुंद स्कायवॉक तयार केला असून, तो जुन्या आणि नव्या एफओबीला जोडतो.
स्कायवॉकचे कामही पूर्ण
प्लॅटफॉर्म २ आणि ३ वर ६.७५ मीटर रुंद स्कायवॉकचे कामही पूर्ण झाले आहे तसेच मध्यवर्ती एफओबीचा विस्तार करून सर्क्युलेशन एरिया वाढवला आहे. कांदिवलीच्या प्लॅटफॉर्म १, २ आणि ३ वर एकूण १८०० चौरस मीटर परिसराचा पृष्ठभाग सुधारला आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी सहा नव्या जिन्यांची उभारणी केली. प्लॅटफॉर्म २ (साउथ एफओबी) आणि मध्य पादचारी पुलावर दोन एस्केलेटर सुरू केले. आणखी एक एस्केलेटर डिसेंबरअखेर कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्लॅटफॉर्म २ आणि ३ वर लिफ्ट सुरू केली असून, लवकरच आणखी एक लिफ्ट प्रवासी सेवेत येणार आहे. यासह उत्तरेकडील आणि मध्य एफओबीला जोडणारा १०० मीटरचा अतिरिक्त एलिव्हेटेड डेक जलद गतीने पूर्ण केला जात आहे.