आता झेडपीची रणधुमाळी; १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान, तर सातला निकाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 06:36 IST2026-01-14T06:36:10+5:302026-01-14T06:36:46+5:30
महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा बसतो न बसतो तोच जिल्हा परिषदांचा बिगुल वाजला

आता झेडपीची रणधुमाळी; १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान, तर सातला निकाल
मुंबई: महापालिका निवडणुकांचा प्रचार संपत असतानाच आता राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान, तर ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
जिल्हा परिषदांच्या ७३१, तर पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषदेत केली. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यावेळी उपस्थित होते.
महापालिका निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने राबवण्यात येईल. तसेच, या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ची मतदार यादी वापरली जाईल. मतदान सुरू होण्याच्या दिनांकापूर्वी २४ तास अगोदर प्रचाराची समाप्ती होईल
विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात निवडणूक नाहीच
आधी नगर परिषद, नंतर महापालिका आणि आता जिल्हा परिषद निवडणूक होत असताना विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात मात्र एकाही ठिकाणी निवडणूक होणार नाही. तेथील सर्व जि.प.मधील आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक असल्याने तेथे निवडणुकीसाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
उमेदवारांसाठी खर्च मर्यादा किती?
७१ ते ७५ निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांसाठी ९ लाख रुपये आणि त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांसाठी ६ लाख रुपये खर्च मर्यादा असेल.
६१ ते ७० निवडणूक विभाग असलेल्या जिल्हा परिषदांसाठी ७ लाख ५० हजार रुपये आणि त्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांसाठी ५ लाख २५ हजार रुपये.
५० ते ६० निवडणूक विभाग असलेल्या परिषदांसाठी सहा लाख आणि त्या अंतर्गतच्या पंचाय जिल्हा समित्यांसाठी ४ लाख ५० हजार रुपये खर्च मर्यादा असेल.
उर्वरित २२ जिल्हा परिषदांचे काय ?
एकूण ३४ जिल्हा परिषदांपैकी २२ जि.प. संदर्भात २१ जानेवारीला सुनावणी आहे. त्यात न्यायालय काय निर्देश देते, त्यावर तेथील निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असेल.