हे निवडणुकांसाठी... भाजपवाले एकदिवस मराठी माणसालाच परप्रांतीय ठरवतील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 07:35 AM2021-09-19T07:35:46+5:302021-09-19T07:36:00+5:30

साकीनाका निर्भया प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात घडणाऱ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

This is for elections ... BJP will one day decide Marathi man as a foreigner, says sanjay raut | हे निवडणुकांसाठी... भाजपवाले एकदिवस मराठी माणसालाच परप्रांतीय ठरवतील

हे निवडणुकांसाठी... भाजपवाले एकदिवस मराठी माणसालाच परप्रांतीय ठरवतील

Next
ठळक मुद्देशिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी याबाबत रोखठोक मत माडले असून आगामी महापालिका निवडणुकांसाठीच भाजपचा हा आटापिटा सुरू असल्याचे ते म्हणाले.

मुंबई - पश्चिम उपनगरात साकीनाका परिसरात घडलेल्या अत्यंत अमानूष अशा प्रकाराने समाजमन हादरुन गेले. एका विकृत परप्रांतीयाने ३२ वर्षांच्या महिलेवर पाशवी बलात्कार करीत निर्दयपणे मारहाण करून तिची हत्या केली. गुप्तांगावर गंभीर जखमा झाल्याने अबलेची रुग्णालयात मृत्यूशी सुरू असलेली झुंज सुमारे ३३ तासांनंतर अपयशी ठरली. त्यावरून, विरोधी पक्षांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यात कायद्याचा धाक उरला नसल्याचंही भाजपाने म्हटले. तसेच, बलात्काऱ्याला जात, धर्म, सीमारेषा नसतात, असे म्हणत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. त्यानंतर, आता शिवसेनेनं रोखठोक मत व्यक्त केलं आहे. 

साकीनाका निर्भया प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात घडणाऱ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर भाजपाने आक्षेप नोंदवला, याप्रकरणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात कांदिवलीतील समता नगर पोलिसात तक्रारही दाखल केली. त्यामुळे या मुद्द्यावरून शिवसेना विरुद्ध भाजपा हा संघर्ष तीव्र होताना दिसत आहे.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी याबाबत रोखठोक मत माडले असून आगामी महापालिका निवडणुकांसाठीच भाजपचा हा आटापिटा सुरू असल्याचे ते म्हणाले. 'साकीनाक्यातील बलात्कार प्रकरणानंतर भाजपने परप्रांतीयांचा मुद्दा उकरून काढला. मुंबईत बाहेरून आलेल्यांवर लक्ष ठेवा, असे मुख्यमंत्री पोलिसांना सांगतात व त्याचे राजकीय भांडवल भाजपसारखे पक्ष करतात. हे राजकारण उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी व मुंबई महानगरपालिकेसाठी चालले आहे. एक दिवस हे लोक मराठी माणसालाच परप्रांतीय ठरवतील!', असे म्हणत भाजपावर टीकेचे बाण सोडले. 

मुंबईत भाजप कोणाला परप्रांतीय मानते

मुंबईसारख्या शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सर्वच जाती-धर्मांचे, प्रांतांचे लोक राहतात. बंगाल, ओडिशा, आसाम, तामीळ, तेलुगू लोकांच्या येथे मोठय़ा वसाहती आहेत. माटुंगा-धारावीवर दाक्षिणात्यांचा मोठा पगडा आहे व ते परप्रांतीय म्हणून राजकीय नृत्य करताना दिसत नाहीत. शिवाजी पार्कात व इतरत्र वर्षानुवर्षे बंगाली समाज दुर्गापूजा करतो व त्याच वेळी शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा सुरू असतो, पण त्या बंगाली लोकांना कधीच परप्रांतीय म्हणून भय वाटले नाही. तामीळ, तेलुगू, मुसलमान आपापले सण-उत्सव साजरे करतात. मुंबई तर बऱयाच अंशी गुजराती बांधवांनी व्यापली आहे. गुजराती, जैन, मारवाडी हे पिढय़ान्पिढय़ा मुंबई-महाराष्ट्राच्या जीवनप्रवाहाचे घटक बनले आहेत. मग मुंबईत भाजप परप्रांतीय कोणाला मानत आहे?

अंबानी अदानींना कोणी 'बाहेरचे' म्हणणार नाही

मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरांच्या आर्थिक नाडय़ा आज मराठी माणसांच्या हाती नाहीत. ज्यांच्या हाती आज त्या आहेत ते सर्वच राजकीय पक्षांना आर्थिक बळ देत असतात. श्रीमंतांना कोणीच परप्रांतीय, उपरे वगैरे मानत नाही. पण पोटासाठी भटकंती करणाऱ्या, मजूर वर्गाला परप्रांतीय म्हणून हिणवले जाते ही शोकांतिका आहे. अंबानी, अदानी, हिरानंदानी, रहेजा, कुकरेजा वगैरेंना कोणी 'बाहेरचे' म्हणणार नाही. राजकारण्यांत ते धाडसही नाही.
 

Web Title: This is for elections ... BJP will one day decide Marathi man as a foreigner, says sanjay raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app