शिक्षकांना आठवड्यातून २ दिवस निवडणूक काम, ही तर निव्वळ धूळफेक : शिक्षकांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 09:25 AM2024-03-02T09:25:56+5:302024-03-02T09:26:10+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या पत्रानंतर शिक्षकांवरील निवडणुकीच्या कामाचा भार हलका करण्याची सूचना निवडणूक आयुक्तांनी केली.

Election work for teachers 2 days a week, this is just a gimic: Criticism of teachers | शिक्षकांना आठवड्यातून २ दिवस निवडणूक काम, ही तर निव्वळ धूळफेक : शिक्षकांची टीका

शिक्षकांना आठवड्यातून २ दिवस निवडणूक काम, ही तर निव्वळ धूळफेक : शिक्षकांची टीका

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आता लोकसभा मतदार यादीच्या कामाकरिता शिक्षकांना आठवड्यातून केवळ मंगळवार आणि शनिवार असे दोनच दिवस काम लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून, तशा सूचना महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिल्या आहेत. मात्र, शिक्षकांवरील निवडणुकीच्या कामाचा भार हलका करण्याच्या नावाखाली करण्यात आलेली ही तरतूद म्हणजे निव्वळ धूळफेक असून, शाळांना कुठलाही दिलासा मिळणार नसल्याची टीका शिक्षकांकडून होत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या पत्रानंतर शिक्षकांवरील निवडणुकीच्या कामाचा भार हलका करण्याची सूचना निवडणूक आयुक्तांनी केली. शिक्षकांना प्रत्यक्ष मतदान व मतमोजणीच्या दिवशीचे प्रशिक्षण मिळून केवळ पाच दिवसच काम लावावे, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. तरीही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून शिक्षकांना राबवून घेतले जात आहे. सरकारी व अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षणाची यामुळे मोठी हेळसांड सुरू आहे. मात्र, आयुक्तांच्या सूचनेनंतरही शिक्षकांच्या मागे लागलेले बीएओंच्या कामाचे शुक्लकाष्ठ सुटलेले नाही.

 आताही शिक्षकांची निवडणुकीच्या कामातून सुटका करण्याच्या नावाखाली आठवड्यातील दोन दिवस राबवून घेतले जाणार आहेच.
 शिक्षकांनी आठवड्याचे चार दिवस शिकवायचे, पण दोन दिवस त्यांच्या वर्गावर कुणी शिकवायचे? असा प्रश्न शिक्षक राजेश पंड्या यांनी केला.
 सरकारकडे बेस्ट, मंत्रालय, महामंडळे अशा विविध आस्थापनांमध्ये कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना बीएलओची कामे का लावली जात नाहीत? प्रत्येक वेळेस शिक्षकांनाच या कामाकरिता का निवडले जाते? असे प्रश्न शिक्षक नेते जालिंदर सरोदे यांनी केले. 

काम न संपणारे 
 सध्या शिक्षकांना लोकसभा निवडणुकीचे काम आहे. काही महिन्यांतच विधानसभा निवडणुका जाहीर होतील. त्यानंतर महापालिकेच्या निवडणुकांचे काम लागेल. हे काम न संपणारे आहे.
 अशाने शिक्षक कायम निवडणुकीच्या कामाकरिता म्हणून शाळाबाह्य राहणार आहे. त्यात सरकारच्या विविध उपक्रमांकरिता, प्रशिक्षणाकरिता शिक्षकांचे अध्यापनाचे तास खर्च होतात, ते वेगळे.

Web Title: Election work for teachers 2 days a week, this is just a gimic: Criticism of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक