निवडणूक लांबली, मुंबईतील सुशोभीकरण मंदावले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 09:52 AM2023-12-29T09:52:15+5:302023-12-29T09:53:21+5:30

मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यापुढे ठेवून राज्य सरकारने सुशोभीकरणाचे विविध प्रकल्प हाती घेण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले आहेत.

Election delayed beautification in Mumbai slowed down | निवडणूक लांबली, मुंबईतील सुशोभीकरण मंदावले

निवडणूक लांबली, मुंबईतील सुशोभीकरण मंदावले

मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यापुढे ठेवून राज्य सरकारने सुशोभीकरणाचे विविध प्रकल्प हाती घेण्याचे आदेश पालिका प्रशासनाला दिले आहेत. मात्र एकूणच निवडणूक लांबणीवर पडल्याने सुशोभीकरणाच्या अनेक कामांची गती मंदावली. काही प्रकल्पांच्या अजून निविदाही निघालेल्या नाहीत. ऑक्टोबर २०२२  सालापासून सुशोभीकरणाच्या कामे सुरू असून, ही कामे मार्च २०२३  पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष होते, मात्र ही डेडलाइन गाठणे अशक्य असल्याचे दिसत आहे.

राज्यात शिंदे-भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर प्रामुख्याने मुंबई पालिकेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आगामी पालिका निवडणूक जिंकण्याचा  चंग सत्ताधाऱ्यांनी बांधला आहे. त्यामुळे मुंबईसाठी विविध विकासकामांची घोषणा करण्यात आली होती. नवीन विकासकामांच्या बाबतीत खुद्द मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातले आहे. त्यांच्या जोडीला दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा या दोन्ही पालकमंत्र्यांनीही अनेक प्रकल्पांच्या घोषणा केल्या. मात्र निवडणूक होत नसल्याने कामांची गती मंदावली आहे.

११३० आजतागायत कामे पूर्ण :

एकूण १ हजार २७८ कामांपैकी आजतागायत ११३० कामे पूर्ण झाली असून ही कामे पूर्ण करण्यासाठी मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पूर्ण झालेल्या झालेल्या कामांपैकी ३८३ कामे शहर भागातील आहेत, तर ७४७ कामे पूर्व आणि पश्चिम उपनगरातील आहेत. सुशोभीकरणाच्या विविध कामांच्या निविदा प्रक्रिया सुरू आहेत.

३० कोटी प्रत्येक विभागांना :

वाहतूक बेटे, रोषणाई, स्कायवॉक सुशोभीकरण, समुद्र किनाऱ्यांवर रोषणाई, रस्ते, पदपथ, उड्डाणपुलाखाली सुशोभीकरण, किल्ल्यांवर रोषणाई, सार्वजनिक स्वच्छता आदी कामांचा समावेश आहे. या कामांसाठी पालिकेच्या  विभाग कार्यालयांना निधी देण्यात आला आहे.  प्रत्येक विभागाला ३० कोटी देण्यात येणार आहेत. त्यापैकी काही निधी वितरित करण्यात आला आहे.

Web Title: Election delayed beautification in Mumbai slowed down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.